Advertisement

Responsive Advertisement

एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन! अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची आरोग्यसेवेत दमदार कामगिरी!


डफरीन रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी मनपा आरोग्य विभागाचा पुढाकार; दीड महिन्यात २०० प्रसूती यशस्वी, डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचे कौतुक

सोलापूर - प्रतिनिधी : आरोग्यसेवा ही केवळ जबाबदारी नसून ती माणुसकी, समर्पण आणि सेवाभावाची खरी कसोटी असते. याच सेवाभावी वृत्तीचा प्रत्यय सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाने आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून घडवून आणला आहे. एकाच दिवसात तब्बल ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया पार पाडत या प्रसूतीगृहाने वैद्यकीय क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी नोंदवली आहे. विशेष म्हणजे, मागील दीड महिन्यात तब्बल २०० प्रसूती यशस्वी करून हे प्रसूतीगृह सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे.

शहरातील डफरीन (शासकीय) रुग्णालयावरील वाढता रुग्णभार लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाने प्रसूतीसेवा अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने एकाच दिवशी सकाळी १ आणि रात्री आणीबाणीच्या परिस्थितीत ४ अशा एकूण ५ सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत वैद्यकीय पथकाने दाखविलेली तत्परता विशेष कौतुकास्पद ठरली आहे.

डॉ. राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची यशस्वी कामगिरी!

महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वी झाली. या शस्त्रक्रियांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी बल्ली, भूलशास्त्रतज्ज्ञ डॉ. सतीश जोशी आणि नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. चाफळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपत्कालीन परिस्थितीतही वैद्यकीय पथकाने उत्तम समन्वय, कौशल्य आणि तत्परता राखत शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.

डॉक्टरांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सेवाभाव मोलाचा!

या यशामागे केवळ डॉक्टरांचे वैद्यकीय कौशल्य नसून प्रसूतीगृहातील संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांचे अहोरात्र परिश्रमही तितकेच महत्त्वाचे आहेत. मेट्रन लेकुरवाळे, सीनियर सिस्टर ढगे, यासीन बागवान, दर्शन परब, चलवादी, घोडके, व्यवहारे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी तारा मावशी, लक्ष्मी मावशी, सुनीता मावशी आणि शबना यांनी रुग्णसेवेसाठी मोलाचे योगदान दिले. रुग्णांची काळजी घेणे, आवश्यक व्यवस्था करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर सेवा देणे अशा विविध जबाबदाऱ्या या कर्मचाऱ्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या सेवाभावामुळेच प्रसूतीगृहातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होत आहे.

दीड महिन्यात २०० प्रसूती; विश्वासार्ह आरोग्यसेवेचा वाढता आलेख!

अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहातील प्रसूतींची वाढती संख्या ही तेथील आरोग्यसेवेवरील नागरिकांचा विश्वास अधोरेखित करणारी आहे. मागील महिन्यात १५० प्रसूती यशस्वी झाल्या, तर चालू महिन्यात आतापर्यंत ५० प्रसूती पूर्ण झाल्या आहेत. अशा प्रकारे अवघ्या दीड महिन्यात २०० प्रसूतींची नोंद झाली आहे. एकाच दिवसात पाच सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची कामगिरी या प्रसूतीगृहाच्या वैद्यकीय सज्जतेची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेची साक्ष देणारी ठरली आहे.

गरजू मातांसाठी महानगरपालिकेचे प्रसूतीगृह ठरतेय आधारवड!

खासगी रुग्णालयांमधील वाढता खर्च आणि शासकीय रुग्णालयांवरील रुग्णांचा ताण अशा परिस्थितीत महानगरपालिकेचे हे प्रसूतीगृह सर्वसामान्य कुटुंबांसाठी महत्त्वाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांनी सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहातील उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया आणि दीड महिन्यात २०० प्रसूतींची नोंद ही केवळ आकडेवारी नाही, तर माता आणि नवजात बालकांना सुरक्षित आरोग्यसेवा देण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची साक्ष आहे. महानगरपालिकेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शहरातील सार्वजनिक आरोग्यसेवेला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments