सोलापूर प्रतिनिधी - उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या अधिपत्याखालील सोलापूर शहर तसेच तालुका न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज केले.राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीसंदर्भातील प्रस्तावावर शासनाकडून अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने चारही न्यायालयीन कर्मचारी महासंघांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाचे लक्ष वेधले.आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ५ नोव्हेंबर रोजी सामूहिक रजा, तर ६ व ७ नोव्हेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा कर्मचारी महासंघांनी दिला आहे.दरम्यान, काळ्या फिती लावून करण्यात आलेल्या आंदोलनात तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम राजेपांढरे, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष शकिल शेख, बेलिफ संघटनेचे अध्यक्ष गणेश सोलनकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष सुकृत कुलकर्णी, प्रबंधक संजय म्याकलवार यांच्यासह सोलापूर शहर व तालुका न्यायालयांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.
0 Comments