१५ नोव्हेंबर : विशेष लेख
भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने २०२१ पासून १५ नोव्हेंबर हा दिवस 'जनजातीय गौरव दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, त्यांचा संघर्ष, त्याग आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण भूमिका यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने आदिवासी लोकजीवन, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक योगदानाचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.
आदिवासी समाज : भारताच्या मूळ संस्कृतीचा वारसा
आर्य लोक दंडकारण्य ओलांडून दक्षिणेकडे येण्यापूर्वी या प्रदेशात भिल्ल, निषाद, किरात, कोल आणि शबर अशा विविध जमातींचे लोक राहत होते. रामायण, महाभारत आणि प्राचीन वाङ्मयातही या समाजांचे उल्लेख आढळतात. आदिवासी समाज हा भारतीय उपखंडाच्या प्राचीन लोकसंस्कृतीचा महत्त्वपूर्ण घटक आहे.
प्राचीन काळात आदिवासी समाज टोळ्याटोळ्यांनी राहत असे. प्रत्येक टोळीचा स्वतंत्र प्रदेश, स्वतंत्र सामाजिक व्यवस्था आणि परंपरा होत्या. बाहेरून आलेल्या विविध समूहांशी काही आदिवासी जमातींनी सामंजस्य निर्माण केले, तर काहींनी आपल्या स्वायत्ततेसाठी संघर्ष केला. अनेक समूहांनी डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलांचा आश्रय घेतला. त्यामुळे आजही देशातील अनेक आदिवासी जमातींची वस्ती प्रामुख्याने वनक्षेत्र, डोंगराळ प्रदेश आणि दुर्गम भागांत आढळते.
निसर्गपूजक जीवनपद्धती आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा
आदिवासी समाजाचे धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन निसर्गाशी अतिशय जवळचे राहिले आहे. निसर्गातील वृक्ष, पर्वत, नद्या, प्राणी, पक्षी आणि विविध नैसर्गिक घटकांना त्यांनी श्रद्धेचे स्थान दिले. अनेक जमातींमध्ये विशिष्ट प्राणी किंवा वृक्ष पवित्र मानण्याची परंपरा आहे. त्यामुळे निसर्गसंवर्धन, पर्यावरणाशी सहजीवन आणि जैवविविधतेचा आदर हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे.
प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र सामाजिक रचना, रूढी, परंपरा आणि सामुदायिक नियम होते. समाजातील व्यक्तीचे जीवन नातेवाईक, गावकरी आणि सामुदायिक व्यवस्थेशी जोडलेले असे. साधी राहणी, स्वावलंबन, मर्यादित गरजा आणि निसर्गाच्या सान्निध्यातील जीवन ही आदिवासी लोकजीवनाची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये होती.
ब्रिटिश राजवटीत आदिवासी समाजाच्या जीवनात बदल
ब्रिटिश राजवट सुरू झाल्यानंतर आदिवासी समाजाच्या जीवनात मोठे बदल घडू लागले. सरकारी अधिकारी, ख्रिस्ती मिशनरी आणि मानववंशशास्त्रज्ञ या भागांत फिरू लागले. त्या काळातील जनगणना अधिकाऱ्यांसमोर आदिवासींच्या धर्म आणि सांस्कृतिक ओळखीचा प्रश्न निर्माण झाला होता. आदिवासींच्या धार्मिक परंपरा तत्कालीन प्रस्थापित धार्मिक चौकटींपेक्षा वेगळ्या असल्याने त्यांची स्वतंत्र ओळख नोंदविण्याची गरज भासली.
पुढील काळात आदिवासी समाजाचा इतर समाजांशी संपर्क, सामाजिक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक परस्परसंबंध वाढले. यामुळे त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनातही परिवर्तन घडत गेले. मात्र या बदलांमध्येही आदिवासी समाजाने आपल्या अनेक पारंपरिक रूढी, सण, उत्सव, भाषा आणि सांस्कृतिक ओळख जपण्याचा प्रयत्न केला.
भारतीय मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून आदिवासी समाज
भारतीय मानववंशशास्त्रज्ञांनी आदिवासी जमातींच्या काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांची नोंद केली आहे. निसर्गाचे सान्निध्य, लहान समूहांमध्ये वस्ती, स्वतंत्र आणि स्वावलंबी जीवनपद्धती, साधी राहणी, पारंपरिक साधने, रूढी-परंपरांचा प्रभाव आणि सामुदायिक जीवनव्यवस्था ही त्यांची काही ठळक वैशिष्ट्ये मानली गेली आहेत.
तथापि, आदिवासी समाज एकसमान नाही. भारतातील प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा, संस्कृती, इतिहास, सामाजिक रचना आणि जीवनपद्धती आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचा अभ्यास करताना त्यातील विविधता आणि स्वतंत्र सांस्कृतिक ओळख लक्षात घेणे आवश्यक आहे.
भगवान बिरसा मुंडा : आदिवासी अस्मितेचे महानायक
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात भगवान बिरसा मुंडा यांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या राजकीय वर्चस्वाविरुद्धच नव्हे, तर आदिवासींच्या जमिनीवरील हक्क, आर्थिक शोषण आणि सामाजिक अन्यायाविरुद्धही संघर्ष उभारला.
त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या 'उलगुलान' या आंदोलनाने आदिवासी समाजात स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि हक्कांची जाणीव निर्माण केली. बिरसा मुंडा हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर आदिवासी समाजाच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनले.
आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा गौरवशाली इतिहास
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध देशाच्या विविध भागांत आदिवासी समाजाने अनेक उठाव आणि आंदोलने केली.
१८५५ मधील संथाळ हुल आंदोलनात सिद्धू आणि कान्हू मुर्मू या बंधूंनी महत्त्वपूर्ण नेतृत्व केले. सध्याच्या झारखंड परिसरात सुरू झालेल्या या आंदोलनाने ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान दिले.
महाराष्ट्रातील गोंड आदिवासी क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. मध्य भारतात तंट्या भिल्ल यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष केला. त्यांच्या शौर्याची गाथा आजही लोकस्मृतीत जिवंत आहे.
महाराष्ट्रातील नाग्या महादू कातकरी यांनी २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जंगल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील स्थानिक जनतेच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षाचा हा महत्त्वाचा अध्याय आहे.
याशिवाय मणिपूरच्या राणी गाईदिन्ल्यू, रांची परिसरातील जतरा उरांव, सिक्कीममधील हेलेन लेपचा, कुर्सेऑंगमधील पुतलीमाया देवी तमांग, आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू आणि ओडिशातील लक्ष्मण नायक यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आदिवासी महिला आणि नेतृत्वाची प्रेरणादायी परंपरा
१९१८ मध्ये गुजरातमधील तापी जिल्ह्यात जन्मलेल्या दशरीबेन चौधरी यांची ऐतिहासिक कामगिरीही प्रेरणादायी आहे. महात्मा गांधी यांची भेट झाल्यानंतर त्यांनी लहान वयातच स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. आदिवासी महिलांनीही सामाजिक आणि राजकीय परिवर्तनात सक्रिय भूमिका बजावल्याचे त्यांचे कार्य दर्शवते.
जयपालसिंग मुंडा आणि संविधान सभेतील आदिवासींचा आवाज
आदिवासी समाजाच्या राजकीय आणि घटनात्मक अधिकारांच्या इतिहासात जयपालसिंग मुंडा यांचे योगदान विशेष महत्त्वाचे आहे. ते भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार होते. त्यांनी संविधान सभेत आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व केले.
आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व, संस्कृती, परंपरा, जमीन आणि सामाजिक हक्क यांविषयी त्यांनी संविधान सभेत आपली भूमिका मांडली. आजच्या आदिवासी तरुणांनी जयपालसिंग मुंडा यांची भाषणे आणि संविधान सभेतील योगदान अभ्यासणे आवश्यक आहे. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत आदिवासी समाजाच्या अपेक्षा काय होत्या आणि आज त्या कितपत पूर्ण झाल्या आहेत, याचा चिकित्सक अभ्यास होणे गरजेचे आहे.
गुरु गोविंद गिरी आणि कोमाराम भीम यांचे योगदान
गुजरात आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात गुरु गोविंद गिरी यांनी भिल्ल समाजाच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. भिल्ल समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी भगत चळवळ सुरू केली. सामाजिक सुधारणा, संघटन आणि समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी कार्य केले.
तेलंगणातील आदिलाबाद परिसरात कोमाराम भीम यांनी गोंड आदिवासी समाजाचे नेतृत्व केले. जल, जंगल आणि जमीन या मूलभूत हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांचा लढा आजही आदिवासी हक्कांच्या चळवळींसाठी प्रेरणादायी मानला जातो.
सह्याद्रीतील आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास उजेडात आणण्याची गरज
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, हैबती खाडे, ढवळा आंगरे, रामा डगळे, होनाजी कैंगले, सत्तू मराडे, खेमा नाईक, जावजी बांबळे, बापू भांगरे, बाळू पिचड, काशिराम किरवे आणि सखाराम सातपुते अशा अनेक व्यक्तींच्या ऐतिहासिक योगदानाचा अभ्यास होणे आवश्यक आहे.
याचबरोबर चौदाव्या शतकात जव्हार येथे राज्याची स्थापना करणारे जायबा मुकणे यांचाही इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
सह्याद्रीतील ठाकर समाजानेही स्वातंत्र्यलढ्यात आणि क्रांतिकारकांच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राघोजी आंगरे यांच्याबाबत कोणतीही माहिती इंग्रज सरकारला देणार नाही, अशी सामुदायिक शपथ ठाकर समाजाने घेतल्याची ऐतिहासिक नोंद सांगितली जाते. या घटनेची पार्श्वभूमी आणि महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.
खानदेशातील भिल्ल नायकांचे योगदानही गौरवशाली आहे. सातमाळा प्रदेशातील चिल नाईक, जोंधळ्या नाईक, जाकिर्या नाईक, सुभान्या नाईक, खाज्या नाईक, भागूजी नाईक आणि काजीसिंग नाईक अशा अनेक क्रांतिकारकांचा इतिहास समाजासमोर आणण्याची गरज आहे.
आदिवासी चळवळी आणि उठावांचा अभ्यास आवश्यक
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने अनेक संघटित आंदोलने आणि उठाव केले. वारली उठाव, भिल्ल पोलीस कॉर्प्स, भिल्ल एजंट व्यवस्था, छोटानागपूरमधील आदिवासी विद्रोह, तमार बंड, संथाळ हुल, देवी गुजरात चळवळ, मिदनापूर आदिवासी चळवळ आणि मालदा परिसरातील जितू संथाल चळवळ अशा अनेक आंदोलनांनी वसाहतवादी सत्तेला आव्हान दिले.
या आंदोलनांचा इतिहास केवळ स्वातंत्र्यलढ्यापुरता मर्यादित नाही. तो आदिवासींच्या जमीन, जंगल, पाणी, स्वायत्तता, सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक अस्तित्वाच्या संघर्षाचाही इतिहास आहे.
आदिवासी इतिहासाचे जतन ही काळाची गरज
'जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज आपले भविष्य सुरक्षित करू शकत नाही,' ही उक्ती आदिवासी समाजाच्या संदर्भात विशेष महत्त्वाची आहे.
आदिवासी समाजाच्या इतिहासाचे संशोधन, दस्तऐवजीकरण आणि प्रसार करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक सुधारक, क्रांतिकारक, महिला नेतृत्व आणि स्थानिक चळवळींचा इतिहास शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासला गेला पाहिजे.
इतिहासावर जितके अधिक संशोधन होईल, तितकी समाजाची ऐतिहासिक जाणीव अधिक प्रगल्भ होईल. आदिवासी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक योगदानावर व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे.
आदिवासी समाजात शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
आदिवासी समाजात शैक्षणिक परिवर्तन घडवायचे असेल, तर शिक्षकांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. केवळ अभ्यासक्रम बदलून किंवा मोफत शिक्षण उपलब्ध करून शैक्षणिक क्रांती घडत नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, शिक्षक, पालक आणि समाज यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांचा विकास, नियमित उपस्थिती, शिस्त, अभ्यासातील सातत्य, वक्तशीरपणा, नैतिक मूल्यांची जाणीव आणि दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याची सवय यांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यामागील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक कारणांचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या मातृभाषेचा, स्थानिक संस्कृतीचा आणि पारंपरिक ज्ञानाचा शिक्षणात योग्य सन्मान राखला पाहिजे. अशा प्रयत्नांतून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता आणि सामाजिक जाणीव निर्माण होऊ शकते.
आदिवासी अस्मिता, स्वाभिमान आणि नव्या पिढीची जबाबदारी
भगवान बिरसा मुंडा जयंती हा केवळ एका महान क्रांतिकारकाचा जन्मदिन नाही, तर आदिवासी समाजाच्या इतिहासाचा, संघर्षाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा गौरव करण्याचा दिवस आहे.
आदिवासी समाजाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी आणि सांस्कृतिक जतनासाठी दिलेले योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी इतिहासाचे संशोधन, लोकपरंपरांचे जतन, मातृभाषांचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक जागृती यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांतून प्रेरणा घेत आदिवासी समाजाने आपली अस्मिता, परंपरा आणि हक्क यांचे जतन करत शिक्षण, संशोधन आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
'आदिवासी मूळ निवासी,
नाळ त्यांची अरण्याशी मनस्वी,
भाबडा स्वभाव, सत्याशी निष्ठा,
ओळख जपती प्रथा-परंपरेशी!'
💐भगवान बिरसा मुंडा जयंती आणि जनजातीय गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
0 Comments