सोलापूर प्रतिनिधी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील फटाके विक्री स्टॉलच्या नियोजनाबाबत महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात फटाके स्टॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. नागरिकांची सुरक्षितता, अग्निसुरक्षा आणि शासनाच्या नियमांचे पालन यांना प्राधान्य देत वीर सावरकर मैदान व चार हुतात्मा पुतळ्यांमागील पार्क स्टेडियम येथे उपलब्ध जागेच्या क्षमतेनुसारच स्टॉल उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित स्टॉलधारकांना होम मैदानावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यंदा फटाके विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उपलब्ध जागेनुसार स्टॉलचे नियोजन करण्यात येणार असून, पुढील वर्षापासून शहरातील सर्व फटाके स्टॉल होम मैदानावर स्थलांतरित करण्याबाबत असोसिएशनने सहमती दर्शविली.
बैठकीत बोलताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की, दिवाळीच्या काळात फटाके खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे स्टॉल उभारताना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्टॉलमध्ये आवश्यक अंतर, मोकळी जागा आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना सहज प्रवेश मिळेल, अशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. उपलब्ध जागेपेक्षा अधिक स्टॉल उभारल्यास आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होऊन जीवितहानीचा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
वीर सावरकर मैदान आणि चार हुतात्मा पुतळ्यांमागील पार्क स्टेडियम येथे फटाके स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, या ठिकाणांची क्षमता मर्यादित असल्याने शासनाच्या निकषांनुसार जेवढे स्टॉल सुरक्षितपणे उभारता येतील, तेवढ्याच स्टॉलधारकांना परवानगी दिली जाणार आहे. यासाठी फटाके स्टॉल असोसिएशनने यापूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या अधिकृत स्टॉलधारकांची यादी महानगरपालिकेला सादर करावी, असे निर्देश देण्यात आले.
वीर सावरकर मैदान व चार हुतात्मा पुतळ्यांमागील पार्क स्टेडियम येथे पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांची नावे असोसिएशनने उपलब्ध करून द्यावीत. त्यानुसार संबंधितांना स्टॉलसाठी जागा देण्यात येणार आहे. तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा, आवश्यक सुरक्षित अंतर आणि स्टॉलधारकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर बैठकीत चर्चा झाली.
अनेक स्टॉलधारकांनी दिवाळीच्या सुमारे तीन महिने आधीच फटाक्यांचा साठा खरेदी केला आहे. त्यामुळे यंदा अचानक स्थलांतर केल्यास त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन यंदा उपलब्ध जागेच्या क्षमतेनुसार स्टॉलधारकांना सामावून घेण्यात येणार आहे. मात्र, पुढील वर्षापासून सर्व फटाके स्टॉल होम मैदानावर हलविण्याच्या प्रस्तावाला असोसिएशनने सहमती दिली.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडळवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त विजयालक्ष्मी कुरी, नगर अभियंता नीलकंठ मठपती, अग्निशमन विभागप्रमुख राकेश साळुंखे तसेच फटाके स्टॉल असोसिएशनचे सुनील रसाळे, बसवराज येरटे, गौरव बेंद्रे, अनिल सावंत, सुनील कत्ते, सन्मित्र काटकर, बाळासाहेब दर्गोपाटील, मनोज जगताप, सुरेश चंद्रगुप्ता, माऊली भोजरंगे, गणेश साठे, अंकिता भुजंग, गणेश घाडगे आदी उपस्थित होते.
0 Comments