सोलापूर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथे आज श्री गणरायाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेचे महापौर तथा प्रथम नागरिक श्री विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते श्रींची पूजा करण्यात आली. यावेळी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी श्री गणरायाचे मनोभावे पूजन करून सोलापूर शहराच्या सुख, समृद्धी, शांतता आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सव हा सोलापूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा उत्सव असून, या उत्सवाच्या माध्यमातून शहरवासीयांमध्ये बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणीताई तळवलकर, गटनेते चेतन नरोटे, गटनेते अमोल बापू शिंदे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, महापालिका अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कौन्सिल हॉलमध्ये श्री गणरायाची पूजा झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. उपस्थित मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले तसेच गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. सोलापूर शहरातील गणेश मंडळे, नागरिक आणि प्रशासन यांच्या समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव आनंददायी व आदर्श पद्धतीने पार पडावा, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
0 Comments