Advertisement

Responsive Advertisement

वादग्रस्त प्रलंबित फायलींच्या निपटाऱ्याबाबत सूर्यकांत भुजबळांची सावध भूमिका!



सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विभागप्रमुखपदी सूर्यकांत भुजबळ यांची नियुक्ती झाल्यापासून जिल्हा परिषद मुख्यालयातील प्रशासकीय कामकाजात शिस्तीला महत्त्व प्राप्त होत असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षांपासून मुख्यालयात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि प्रशासकीय निर्णयांमुळे भुजबळ यांची शिस्त पाळणारे आणि शिस्त लावणारे अधिकारी अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.

भुजबळ यांच्या शिस्तप्रिय कार्यपद्धतीचा अनुभव जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यापूर्वीपासून प्रलंबित असलेल्या विविध विभागांतील फायलींच्या निपटाऱ्याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या पूर्वीच्या कार्यकाळात काही वादग्रस्त फायलींवर निर्णय न घेता त्या प्रलंबित ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. आता विभागप्रमुखपदाची जबाबदारी सूर्यकांत भुजबळ यांनी स्वीकारल्यानंतर अशा फायली मार्गी लावण्यासाठी काही विभागांमधून प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

मात्र, या प्रक्रियेत नियमांतील पळवाटा शोधून वादग्रस्त प्रस्तावांना मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशीही प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. काही प्रकरणांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या कथित चर्चाही रंगत असल्याचे बोलले जात आहे. तथापि, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

सामान्य प्रशासन विभागातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता सूर्यकांत भुजबळ यांनी अशा संवेदनशील आणि वादग्रस्त फायलींबाबत घाईघाईने निर्णय न घेता त्यांची कायदेशीर पडताळणी होईपर्यंत त्या प्रलंबित ठेवण्याची सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

या भूमिकेमुळे नियमबाह्य मार्गाने फायली मंजूर होण्याची अपेक्षा ठेवून असलेल्या काही घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, नियमानुसार आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकटीत राहावे, यासाठी सूर्यकांत भुजबळ यांनी घेतलेली सावध भूमिका कायम ठेवावी, अशी अपेक्षा कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.

वादग्रस्त फायलींच्या निपटाऱ्यात नियमांना प्राधान्य मिळणार की दबावाला? याकडे आता संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments