Advertisement

Responsive Advertisement

वटवृक्ष मंदिरातील दर्शन व्यवस्थेचे नियोजन कौतुकास्पद; खासदार नीलेश लंके यांच्याकडून प्रशंसा!


स्वामी भक्तांसाठीच्या सुविधा, दर्शन रांग आणि आरती व्यवस्थेचे केले कौतुक; देवस्थानच्या विकासकामांसाठी सहकार्य करण्याची ग्वाही

अक्कलकोट - प्रतिनिधी : लाखो स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील दर्शन व्यवस्थेचे नियोजन अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले. नुकतीच त्यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरातील विविध सुविधांची पाहणी करून देवस्थान समितीच्या कार्याचे कौतुक केले.

याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल गवंडी यांनी खासदार नीलेश लंके यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार नीलेश लंके म्हणाले की, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुलभ, शांत आणि समाधानकारक दर्शन मिळावे, यासाठी देवस्थान समितीने केलेले नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे. भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, दर्शन रांगेचे नियोजन तसेच आरतीसाठी केलेली आसन व्यवस्था पाहून समाधान वाटले.

चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान व्यवस्थापनाने दर्शन रांग, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमध्ये चांगली सुधारणा केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची घेतली जाणारी काळजी प्रशंसनीय आहे. भाविकांना कोणताही त्रास न होता दर्शन घेता यावे, यासाठी सुरू असलेले प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहेत.

श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अक्कलकोटचा सर्वांगीण विकास व्हावा, देवस्थानात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढावी आणि येथील दर्शन व्यवस्था अशीच आदर्श राहावी, हीच स्वामी चरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देवस्थानच्या आगामी विकासकामांसाठी आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाहीही खासदार नीलेश लंके यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी व्यंकटेश पुजारी, रुद्रय्या स्वामी, श्रीकांत मलवे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव यांच्यासह स्वामी भक्त आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments