सोलापूर - प्रतिनिधी : लहान मुलांच्या आवडीचे चायनीज पदार्थ तयार करताना चव वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अजिनोमोटोच्या वापराबाबत सोलापूर शहरात अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील विविध चायनीज सेंटर, फास्ट फूड दुकाने आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अजिनोमोटोचा वापर नियमांनुसार केला जातो की नाही, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्नसुरक्षेच्या दृष्टीने कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत असताना, सोलापूर शहरातील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवरही प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
अजिनोमोटो अर्थात मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) हे पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरले जाणारे घटक आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार त्याचा वापर काही खाद्यपदार्थांमध्ये निर्धारित अटी आणि मर्यादांनुसार करता येतो. मात्र, बारा महिन्यांखालील बालकांसाठी असलेल्या अन्नामध्ये तसेच नियमांमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर प्रतिबंधित आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ तयार करताना नियमांचे पालन आणि योग्य लेबलिंग करणे आवश्यक आहे.
विशेषतः लहान मुलांना आवडणारे चायनीज नूडल्स, फ्राईड राईस, मंच्युरियन आणि सूप यांसारख्या पदार्थांच्या निर्मितीमध्ये कोणते घटक वापरले जातात, याची तपासणी होणे गरजेचे आहे. खाद्यपदार्थांमधील घटकांची माहिती, स्वच्छता, गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत पालकांनीही जागरूक राहणे आवश्यक आहे.
दरम्यान, शाळांच्या परिसरातील खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, जंक फूड स्टॉल्स आणि चायनीज सेंटर यांची अचानक तपासणी करावी. संशयास्पद खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा विषय असल्याने एफडीएच्या सोलापूर विभागाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी आणि शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Comments