Advertisement

Responsive Advertisement

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम! पंढरपुरातील १२ आस्थापनांची तपासणी; खाद्यपदार्थांचे १८ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले


सोलापूर - प्रतिनिधी : कार्तिकी वारीसाठी पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी आणि प्रसाद विक्री केंद्रांसह एकूण १२ आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी विविध खाद्यपदार्थांचे १८ नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आणि भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. या गर्दीच्या काळात भाविकांना भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे अथवा अस्वच्छ वातावरणात तयार केलेले खाद्यपदार्थ विकले जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांची साठवणूक, परिसरातील स्वच्छता, अन्न तयार करण्याची पद्धत, वापरण्यात येणारे खाद्यतेल, कृत्रिम रंग तसेच इतर घटकांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. व्यावसायिकांकडून अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याचीही तपासणी करण्यात आली.

नमुने निकृष्ट आढळल्यास कठोर कारवाई

तपासणीदरम्यान संकलित करण्यात आलेल्या १८ नमुन्यांचे प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यात येणार आहे. या विश्लेषणाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

वारी कालावधीत सर्व अन्न व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे निकष काटेकोरपणे पाळावेत. भाविकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.

भेसळीबाबत तक्रार करण्याचे आवाहन

दरम्यान, वारीदरम्यान खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ऑनलाइन FDA तक्रार पोर्टलवरही तक्रार नोंदविता येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments