Advertisement

Responsive Advertisement

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या! जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे संबंधित विभागांना निर्देश

पंढरपूर - प्रतिनिधी : कार्तिकी शुद्ध एकादशी शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी असून, यंदाची कार्तिकी यात्रा दि. १० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या यात्रेसाठी सुमारे १२ ते १३ लाख भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता आहे. यात्रेच्या कालावधीत भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्यासाठी अतिरिक्त पथके नियुक्त करावीत. तसेच चंद्रभागा वाळवंट, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासह संपूर्ण शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

कार्तिकी यात्रा नियोजनाच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम डुबल, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंकज कुंभार, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रा कालावधीत भाविकांना मुबलक प्रमाणात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. शहरातील स्वच्छतेची योग्य व्यवस्था ठेवावी. अनधिकृत होर्डिंग तातडीने हटवावेत. वाहनतळांच्या ठिकाणी मुरमीकरण करून पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. भक्तिसागर येथे वारकरी आणि भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या.

दर्शनरांगेत भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनरांगेतील बॅरिकेडिंग सुस्थितीत ठेवावे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जर्मन हँगर उभारून त्यामध्ये पिण्याचे पाणी, भोजन, सुलभ शौचालये आणि मॅटची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवून अतिरिक्त खाटांची व्यवस्था करावी. तसेच भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी आरोग्यदूतांची नियुक्ती करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

वाखरी येथे यात्राकाळात मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरत असल्याने पशुवैद्यकीय विभागाने स्वतंत्र पथक नियुक्त करावे. या पथकामार्फत जनावरांचे लसीकरण, औषधोपचार तसेच जनावरे आणि पशुपालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करा

चौपाळा ते शिवाजी चौक या दरम्यान रिक्षांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत तातडीने आवश्यक कारवाई करावी. अन्न व औषध प्रशासनाने स्वतंत्र पथके नियुक्त करून शहरातील तसेच परिसरातील खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि दूध विक्री केंद्रांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

सरगम चौकातील राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले काम यात्रेच्या काळात वाहतुकीस अडथळा ठरणार नाही, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. महावितरणने अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा करावा. भाविकांसाठी उपलब्ध असलेल्या गॅस वितरण केंद्रांवर अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी.

राज्य परिवहन विभागाने बसस्थानकात शुद्ध पिण्याच्या पाण्याची आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी. तसेच दगडी पुलावर तात्पुरते बॅरिकेडिंग करून वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

मंदिर समिती व नगरपरिषदेच्या तयारीचा आढावा

यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांग आणि दर्शनमंडप येथे भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपरिषदेमार्फत यात्रेसाठी करण्यात येणाऱ्या विविध व्यवस्थांची माहिती सादर केली.

बैठकीत पाटबंधारे विभाग, राज्य परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

कार्तिकी यात्रा सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात. तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यावेळी दिले.

Post a Comment

0 Comments