Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा! ३०० कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांचे वाटप; उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच मिळणार लाभ

सोलापूर - प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक दिलासा मिळत आहे. शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रीम मदतीचे वाटप सुरू असून, आजअखेर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण ३०० कोटी ८९ लाख ७५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.

राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

दुष्काळामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकवर्गवारी आणि क्षेत्रनिहाय निकषांनुसार मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीचा आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत थेट बँक खात्यात जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली होती. या निर्णयाला २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्देशानुसार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments