सोलापूर - प्रतिनिधी : नागरिकांच्या तक्रारी आणि अर्जांवर विहित मुदतीत कार्यवाही न करणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘आपली तक्रार पोर्टल’, ‘माय सोलापूर ॲप’ तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्राप्त अर्जांवर वेळेत कार्यवाही न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकूण ९१ हजार ९०० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर २०२६ च्या वेतनातून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नागरिकांनो, तक्रार नोंदवा; प्रशासनाला उत्तर द्यावेच लागणार!
शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्यात, यासाठी महापालिकेने ‘आपली तक्रार पोर्टल’ आणि ‘माय सोलापूर ॲप’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विविध १३६ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि विविध कामांसाठीचे अर्ज या ऑनलाइन माध्यमांतून नोंदविल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विहित मुदतीत कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी प्राप्त तक्रारी व अर्ज प्रलंबित ठेवल्याचे संगणक विभागाकडून प्राप्त अहवालात उघड झाले आहे. काही कर्मचाऱ्यांनी आवश्यक माहितीही अद्ययावत केली नसल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी तसेच महापालिकेच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी ‘आपली तक्रार पोर्टल’ आणि ‘माय सोलापूर ॲप’चा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दोन गटांतील कर्मचाऱ्यांना दंड
महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईनुसार, तक्ता ‘अ’ मधील कर्मचाऱ्यांकडून १६ हजार ८०० रुपये, तर तक्ता ‘ब’ मधील लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ७५ हजार १०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ९१ हजार ९०० रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला आहे.
नोव्हेंबरच्या वेतनातून होणार वसुली
संबंधित दोषी कर्मचाऱ्यांच्या (नोव्हेंबर २०२६ ते डिसेंबर २०२६ मध्ये देय) या महिन्याच्या वेतनातून किंवा मानधनातून दंडाची रक्कम एकरकमी वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही रक्कम संबंधित ठेकेदाराच्या देय रकमेतून कपात करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. या कारवाईनंतर तरी नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होणार का, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
0 Comments