मोहोळ - प्रतिनिधी : पोलीस दलात कार्यरत असलेल्या दोन महिला सहाय्यक फौजदारांविरोधात घरात घुसून मारहाण, शिवीगाळ आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका महिला फौजदाराने पोलीस गणवेशात असतानाच मारहाण केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. विशेष म्हणजे, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कुटुंबीयांना तेथेही शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सविता राजेंद्र आंधारे (वय ५५, रा. कुंभारखानी, मोहोळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कविता छबू घाडगे आणि जया छबू घाडगे ऊर्फ मुस्कान म. इसाक मुजावर या दोघींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोघीही सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात सहाय्यक महिला फौजदार म्हणून कार्यरत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
जबाबावरून वाद; घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सविता आंधारे, त्यांचे पती राजेंद्र आणि मुलगा पंढरीनाथ हे घरी असताना दोन्ही संशयित महिला त्यांच्या घरासमोर आल्या. खाजा मुजावर यांच्या बाजूने जबाब का दिला, असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर घराच्या दरवाजाला लाथा मारून घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे.
यावेळी कविता घाडगे या पोलीस गणवेशात होत्या. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील दगडाने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारल्याने जखम होऊन रक्तस्राव झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कारचे नुकसान; पोलीस ठाण्यातही धक्काबुक्की
घरातून बाहेर पडताना लोखंडी गेटला लाथा मारून नुकसान करण्यात आले. तसेच अंगणात उभ्या असलेल्या होंडा सिटी कारच्या दरवाजावर दगड मारून डेंट पाडल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेनंतर आंधारे कुटुंबीय तक्रार देण्यासाठी मोहोळ पोलीस ठाण्यात गेले असता तेथेही शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
घरातील सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा
घटनेच्या वेळी मुलगा पंढरीनाथ याने डायल ११२ वर संपर्क साधल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार चित्रित झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
दरम्यान, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांविरोधातच गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. पोलीस गणवेशात मारहाण केल्याचा आरोप आणि घरातील सीसीटीव्ही फुटेजचा दावा यामुळे तपासाकडे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल नितीन हरिचंद्र चौरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तपासातून या घटनेतील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
0 Comments