Advertisement

Responsive Advertisement

प्रसादाच्या नावाखाली गुंगीची चिक्की; ५० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास! कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये दाम्पत्याला गुंगी आणून चोरी; सोलापूर लोहमार्ग पोलिसांची सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून कारवाई, रेकॉर्डवरील महिला आरोपी अटकेत

सोलापूर - प्रतिनिधी : रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्तीवर ठेवलेला विश्वास एका दाम्पत्याला चांगलाच महागात पडला. प्रसाद देण्याच्या बहाण्याने गुंगीकारक औषध मिसळलेली चिक्की खायला देऊन दाम्पत्याला बेशुद्ध करण्यात आले आणि त्यांच्या जवळील तब्बल ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेण्यात आले. या धक्कादायक चोरीचा सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे छडा लावला असून, रेकॉर्डवरील महिला आरोपीला अटक केली आहे.

गीतादेवी ऊर्फ मीनादेवी रामनरेश थोर (वय ५७, रा. इटावा, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील रहिवासी गोविंद व्यंकटेश कुमार हे १५ सप्टेंबर २०२६ रोजी कोपरगाव ते मंत्रालय असा रेल्वे प्रवास करीत होते. यावेळी आरोपी महिलेने त्यांच्याशी आणि त्यांच्या पत्नीशी ओळख वाढवली. विश्वास संपादन केल्यानंतर प्रसाद असल्याचे सांगत गुंगीकारक औषध मिसळलेली चिक्की त्यांना खाण्यास दिली. चिक्की खाल्ल्यानंतर दाम्पत्याला गुंगी आली. याच संधीचा फायदा घेत महिलेने त्यांच्या जवळील ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर गोविंद कुमार यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, तांत्रिक माहितीचे विश्लेषण करणे आणि विविध ठिकाणी शोधमोहीम राबविणे अशा माध्यमांतून आरोपीचा मार्ग काढण्यात आला. अखेर छत्रपती संभाजीनगर येथून संशयित महिलेला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

अनेक लोहमार्ग पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या महिलेविरुद्ध छत्रपती संभाजीनगर, कल्याण लोहमार्ग, दादर लोहमार्ग आणि मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांतही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून चोरी करणारी ही महिला सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

१६ नोव्हेंबर रोजी सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी करीत आहेत.

या संपूर्ण कारवाईची माहिती पोलीस निरीक्षक महेश भावी कट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रेल्वे प्रवाशांनो, अनोळखी व्यक्तींकडून खाद्यपदार्थ घेणे टाळा!

रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींनी दिलेले प्रसाद, चिक्की, खाद्यपदार्थ किंवा पेये स्वीकारणे धोकादायक ठरू शकते. काही क्षणांच्या विश्वासामुळे मौल्यवान वस्तू आणि आयुष्यभराची कमाई गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींकडून कोणतेही खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत. तसेच सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी.

Post a Comment

0 Comments