सोलापूर - प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर विभागाने अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. १ एप्रिल २०२६ ते १८ नोव्हेंबर २०२६ या अवघ्या साडेसात महिन्यांच्या कालावधीत तब्बल १० कोटी ५८ लाख ३६ हजार ३५९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कालावधीत एकूण १,९४१ गुन्हे दाखल करून २,०३६ जणांवर कारवाई करण्यात आली असून १९५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार, सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव आणि उपअधीक्षक सौरभ बा. अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
इचगाव टोलनाक्यावर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक पकडली
दरम्यान, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील इचगाव टोलनाका परिसरात, ता. मोहोळ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत २,००० मिलीच्या ७१ बाटल्या आणि १८० मिलीच्या १३ बॉक्समधील ६२४ बाटल्या, अशा एकूण ६९५ विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय टाटा कंपनीचे इंट्रा पिकअप वाहन आणि होंडा कंपनीची शाईन मोटारसायकलही जप्त करण्यात आली. या प्रकरणात एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून एकूण ११ लाख २३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध मद्याविरोधातील कारवाईचा धडाका
१ एप्रिल ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, परराज्यातील मद्य, देशी-विदेशी मद्य, बनावट मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात व्यापक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत ७ लाख १७ हजार ८६ लिटर रसायन, ५१ हजार ३१३ लिटर हातभट्टी दारू, ९ हजार ३४० बल्क लिटर परराज्यातील मद्य, ४ हजार १४३ बल्क लिटर देशी मद्य, १ हजार १९९ बल्क लिटर विदेशी मद्य, ९०७.१७ बल्क लिटर बिअर आणि ११ हजार १८० बल्क लिटर ताडी जप्त करण्यात आली.
तसेच ३ लाख ३१ हजार ४९० रिकाम्या बाटल्या, १ लाख ३३ हजार १६० बनावट बुचे, १ लाख ५५ हजार ४०० बनावट लेबल आणि १३ हजार ८०० लिटर स्पिरिट असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ढाबा मालकांसह जागामालकांवरही कारवाईचा इशारा
अवैध ढाब्यांवर मद्यविक्री, अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक अथवा मद्य साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या जागांच्या मालकांनाही संबंधित कारवाईत आरोपी करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अवैध मद्य व्यवसायाला जागा उपलब्ध करून देणाऱ्यांनीही सावध राहण्याची गरज आहे.
विषारी बनावट मद्यापासून सावध राहण्याचे आवाहन
मिथेनॉलयुक्त बनावट मद्यामुळे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम होऊ शकतात. पुणे येथील दुर्घटनेत विषारी मद्यामुळे नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा मद्यापासून दूर राहावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मिथेनॉलयुक्त मद्याच्या सेवनामुळे किडनी निकामी होणे, कायमस्वरूपी अंधत्व येणे तसेच अकाली मृत्यू होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता नागरिकांनी केवळ अधिकृत आणि सुरक्षित मद्याचाच वापर करावा, असे आवाहन अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव यांनी केले आहे.
अवैध मद्याची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक
आपल्या परिसरात अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक तसेच मिथेनॉल, क्लोरल हायड्रेट किंवा तत्सम पदार्थांची निर्मिती, भेसळ आणि विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी.
यासाठी विभागाने १८००२३३९९९९ हा टोल फ्री क्रमांक आणि ८४२२००११३३ हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईत दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे, विकास थोरात, जवान आण्णासाहेब कर्चे, नंदकुमार वेळापूरे, आण्णासाहेब फड, पवन उगले आणि शिवानी मुढे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. डी. कांबळे करीत आहेत.
0 Comments