Advertisement

Responsive Advertisement

समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकचा २५ वाहनांना धडक; भीषण अपघातात ४ ते ५ जण जखमी! टँकर उलटल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; लोखंडी कॉइल वाहून नेणारा ट्रक घुसला वाहनांच्या गर्दीत

बुलढाणा - प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. दुसरबीड परिसरातील तळेगावजवळ दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास भरधाव मालट्रकने रांगेत उभ्या असलेल्या तब्बल २५ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात ४ ते ५ प्रवासी जखमी झाले असून, अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ३२१ व्या किलोमीटरजवळ सकाळी एक टँकर उलटला होता. टँकरमधील माल रस्त्यावर पसरल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेट्स लावून वाहतूक रोखली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

भरधाव ट्रक घुसला वाहनांच्या रांगेत

वाहतूक पूर्ववत होण्याची प्रतीक्षा करत अनेक प्रवासी आपल्या वाहनांमध्ये थांबले होते. त्याचवेळी लोखंडी कॉइल घेऊन जाणारा एक मालट्रक भरधाव वेगाने मागून आला. समोर वाहनांची रांग असतानाही ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट उभ्या वाहनांवर आदळला. ट्रकच्या धडकेमुळे पुढील वाहने एकमेकांवर आदळली आणि अपघातांची मालिका सुरू झाली.

या धडकेत सुमारे २५ वाहनांचे नुकसान झाले असून, त्यापैकी सात ते आठ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

ट्रक चालकाची चौकशी सुरू

वाहनांची रांग स्पष्ट दिसत असतानाही ट्रक चालकाने वेळीच ब्रेक का लावला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चालकाने मद्यप्राशन केले होते का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, यासंदर्भात पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी ट्रक चालकाची चौकशी सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments