Advertisement

Responsive Advertisement

फौजदार चावडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! ८ तासांत मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे उघड; २.१० लाखांच्या ३ दुचाकी जप्त


चोरीच्या आरोपाखाली २६ वर्षीय तरुणाला अटक; रिक्षात विसरलेली महिलेची पाच ग्रॅम सोन्याची पर्स अवघ्या दोन तासांत परत

सोलापूर प्रतिनिधी : फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे अवघ्या ८ तासांत उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी एका २६ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल २ लाख १० हजार रुपये किमतीच्या ३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याचबरोबर रिक्षात विसरलेली एका महिलेची पाच ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली पर्स अवघ्या दोन तासांत शोधून महिलेला परत देत पोलिसांनी माणुसकीचेही दर्शन घडविले.

दि. १२ नोव्हेंबर रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एकाच वेळी ३ नागरिकांनी मोटारसायकल चोरीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या तिन्ही मोटारसायकली दि. १० नोव्हेंबर रोजी सरस्वती चौक परिसरातून चोरीला गेल्या होत्या. यामध्ये तानाजी रवि मोहन पसुल यांची एचएफ डिलक्स, तानाजी शिवाजी चव्हाण यांची हिरो होंडा सीडी डिलक्स आणि मोहम्मद युसुफ इब्राहिम चौधरी यांची बजाज डिस्कव्हर या ३ मोटारसायकलींचा समावेश होता.

३ ही चोरीच्या घटनांमध्ये साम्य असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रोहन सुभाष बालनकर (वय २६, रा. गणपती मंदिराजवळ, एन.जी. मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) याला कडबा मैदान, जुनी मिल कंपाऊंड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ३ ही मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ३ ही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या ८ तासांत आरोपीला पकडून ३ ही चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले.

रिक्षात विसरलेली सोन्याची पर्स २ तासांत परत

दरम्यान, दि. १३ नोव्हेंबर रोजी सरोजा सुनील टिकाबरे (वय ३५, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) या कुंभार वेस येथून रिक्षाने प्रवास करून काळे हॉस्पिटल, नवी पेठ येथे आल्या होत्या. रिक्षातून उतरताना सोन्याचे दागिने असलेली पर्स रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या काही वेळाने लक्षात आले. मात्र, रिक्षाचा नंबर किंवा अन्य कोणतीही माहिती त्यांच्याकडे नव्हती.

घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने त्यांच्या तक्रारीची दखल घेत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित रिक्षाचा शोध घेतला. पोलीस अंमलदार विनायक जाधव यांनी विशेष प्रयत्न करून ५ ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली पर्स अवघ्या २ तासांत शोधून महिलेला सुखरूप परत केली. हरवलेली पर्स पुन्हा मिळाल्याने महिलेच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर तसेच पोलीस हवालदार विनायक काळे, महेश शिंदे, बसवराज परीट, पोलीस अंमलदार सुधाकर माने, सुहास गायकवाड, अजय चव्हाण, विनायक जाधव, सुरज सोनवलकर, पंकज घाडगे, कृष्णा बडुरे, विनोद व्हटकर, शशिकांत दराडे आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे अल्पावधीत उघडकीस आणणे आणि महिलेचे हरवलेले सोन्याचे दागिने सुरक्षित परत मिळवून देणे, या दुहेरी कामगिरीमुळे फौजदार चावडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments