सोलापूर - प्रतिनिधी : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि नावीन्याचा सण! याच सणाचे औचित्य साधत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला कृतीची जोड देत सर्जनशीलतेचा अनोखा आविष्कार घडविला. सुगंधी उटणे, शंभर टक्के रसायनविरहित हर्बल साबण, आकर्षक पणत्या, आकाशकंदील, विविध पेंटिंग्ज आणि हस्तनिर्मित चॉकलेट तयार करून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना अनोखे व्यासपीठ मिळवून दिले.
पंचायत समिती, दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यातील कल्पकता, सर्जनशीलता, कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करण्याबरोबरच उद्योजकतेची बीजे रुजविणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती इयत्ता दुसरीतील चिमुकली विद्यार्थिनी श्रद्धा केवटे ! तिने स्वतः तयार केलेल्या हर्बल साबणाची निर्मिती प्रक्रिया, त्यासाठी वापरण्यात आलेले घटक आणि साबणाची वैशिष्ट्ये यांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासमोर अत्यंत आत्मविश्वासाने सादर केली. एवढ्या लहान वयात विषयाची असलेली समज, त्याविषयीची माहिती आणि ती मांडण्याची तिची प्रभावी पद्धत पाहून कुशल जैन विशेष प्रभावित झाले. त्यांनी श्रद्धाचे मनापासून कौतुक केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, मेहनतीचे आणि उत्साहाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेले सुगंधी उटणे आणि हर्बल साबण दिवाळीच्या शुभेच्छांसह मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना भेट दिले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांनाही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू भेटस्वरूपात दिल्या.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुहासिनी शेंडे आणि शिक्षक प्रकाश कुंभार यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी, गुरुबाळ सनके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव आदी उपस्थित होते.
चौकट : पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्यांचा धडा !
विद्यार्थ्यांनी स्वतः वस्तू तयार करणे, त्यांच्या निर्मितीमागील प्रक्रिया समजून घेणे आणि तयार केलेल्या वस्तूंची माहिती आत्मविश्वासाने सादर करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, स्वावलंबन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उद्योजकतेची आवड विकसित होण्यास मदत होते. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या मंद्रूपच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि कर्तृत्वातून याची सुंदर प्रचिती दिली!
0 Comments