सोलापूर - प्रतिनिधी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने माढा तालुक्यातील सापटणे (टें.) येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए), सोलापूर कार्यालय आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा जलसंवर्धन उपक्रम राबविण्यात आला. स्थानिक साधनसामग्रीचा वापर करून कमी खर्चात जलसंधारणाची प्रभावी कामे करता येतात, हे ग्रामस्थांनी कृतीतून दाखवून दिले.
सोलापूर जिल्ह्यात पावसाचे अनिश्चित प्रमाण आणि वारंवार उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने सापटणे येथे सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू आणि माती भरून त्यांची योग्य रचनेत मांडणी करत वनराई बंधारा बांधण्यात आला. या कामात ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि वेग नियंत्रित होण्यास मदत होते. तसेच पाणी जमिनीत मुरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. परिणामी स्थानिक भूजल पुनर्भरणाला चालना मिळू शकते. विशेषतः सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींच्या पाणलोट क्षेत्रात अशा प्रकारची कामे केल्यास गावाच्या जलसुरक्षेला बळकटी मिळू शकते.
लोकसहभागातून जलसंवर्धनाची चळवळ उभारण्याचे आवाहन
जलसंधारणासाठी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता ग्रामपंचायत, शेतकरी, महिला बचत गट, युवक मंडळे आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानातून जलसंवर्धनाची चळवळ उभारावी. प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील नैसर्गिक नाले, ओढे आणि पाण्याच्या प्रवाहांचा अभ्यास करून योग्य ठिकाणी जलसंधारणाची कामे करावीत, असे आवाहन करण्यात आले.
पाण्याची समस्या ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक गावाची सामूहिक जबाबदारी आहे. सापटणे ग्रामस्थांनी श्रमदानातून दिलेला संदेश इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे मत वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुस्ताक शेख यांनी व्यक्त केले.
३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या या उपक्रमात वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुस्ताक शेख, सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. संजय साबळे, संतोष पाटील, विनायक निंबाळकर, डॉ. फरजाना बिराजदार, कनिष्ठ भूवैज्ञानिक एम. डी. नदाफ, अनिता बनसोडे, विशाल चौधरी यांच्यासह सापटणे येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
0 Comments