सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूरच्या कृषी विभागात कार्यरत असलेल्या उपसंचालकाच्या कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले किरण श्यामराव जाधव यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उघड चौकशीत निष्पन्न झाले आहे. उत्पन्नाच्या तुलनेत १२८.७ टक्के अधिक मालमत्ता आढळल्याने किरण जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी संगीता जाधव यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण जाधव हे यापूर्वी कृषी विभागाच्या दक्षता पथकात कृषी उपसंचालक तसेच गुणनियंत्रण विभागात तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते सोलापूर येथील आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात उपसंचालक (वर्ग-१) या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मालमत्तेबाबत उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सविस्तर तपास केला.
या तपासादरम्यान ४ जून १९९४ ते २ डिसेंबर २०२५ हा परीक्षण कालावधी निश्चित करण्यात आला होता. या कालावधीत जाधव यांच्या ज्ञात आणि वैध उत्पन्नाच्या तुलनेत ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची अपसंपदा आढळून आल्याचे तपासात निष्पन्न झाले. उत्पन्नापेक्षा १२८.७ टक्के अधिक मालमत्ता असल्याचे चौकशीत समोर आले.
या प्रकरणात किरण जाधव यांना अपसंपदा जमविण्यास
पत्नी संगीता जाधव यांनी अपप्रेरणा दिल्याचे चौकशीत
निष्पन्न झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नमूद केले आहे. त्यामुळे दोघांविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची उघड चौकशी अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी केली. पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले करीत आहेत. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मालमत्तेबाबत उघड झालेल्या या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एसीबीच्या तपासात समोर आलेल्या मालमत्तेच्या आकडेवारीमुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष लागले आहे.
0 Comments