सोलापूर प्रतिनिधी: गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. मिरज-सोलापूर महामार्गावरील इचगाव टोलनाक्याजवळ (ता. मोहोळ) करण्यात आलेल्या या कारवाईत २३८ बॉक्स विदेशी मद्य व बिअरसह टाटा कंपनीचे इंट्रा वाहन असा एकूण ३० लाख ९९ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर कारवाई करून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या ७५० मिली व १८० मिली क्षमतेच्या एकूण ३ हजार ८८८ बाटल्या, बिअरच्या २६४ बाटल्या असा मुद्देमाल आढळून आला. यामध्ये २ हजार ६८ ब.लि. विदेशी मद्य आणि १३२ ब.लि. बिअरचा समावेश आहे. मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे टाटा कंपनीचे चारचाकी इंट्रा वाहनही जप्त करण्यात आले.
सात महिन्यांत १० कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात व्यापक मोहीम राबविली. या कालावधीत एकूण १ हजार ८२५ गुन्हे दाखल करून १ हजार ९२५ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच १८२ वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण १० कोटी २२ लाख ९७ हजार ७५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत ६ लाख ७२ हजार ८६६ लिटर रसायन, ४८ हजार ६९२.५ लिटर हातभट्टी दारू, ९ हजार ३३८.१७ ब.लि. परराज्यातील मद्य, ३ हजार ९२६.०४ ब.लि. देशी मद्य, १ हजार १६८.२ ब.लि. विदेशी मद्य आणि ९०७.१७ ब.लि. बिअर जप्त करण्यात आली. याशिवाय २० हजार ६५८.८ ब.लि. ताडी, ३ लाख ३१ हजार ४९० रिकाम्या बाटल्या, १ लाख ३३ हजार १६० बनावट बुचे, १ लाख ५५ हजार ४०० बनावट लेबल आणि १३ हजार ८०० लिटर स्पिरिटही जप्त करण्यात आले आहे.
अवैध मद्यविक्री करणाऱ्यांसह जागामालकांवरही कारवाई
अवैध ढाब्यांवर मद्यविक्री करणे, अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक व वाहतूक करणे यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागांच्या मालकांनाही कारवाईत आरोपी करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम होऊ शकतात. किडनी निकामी होणे, कायमस्वरूपी अंधत्व येणे आणि मृत्यू होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी अशा विषारी व बनावट मद्यापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवैध मद्याची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक
आपल्या परिसरात अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास तसेच मिथेनॉल, क्लोरल हायड्रेट यांसारख्या पदार्थांची निर्मिती, भेसळ, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी तातडीने विभागाला माहिती द्यावी.
यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ यावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.
या धडक कारवाईत निरीक्षक जे. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक राम निबाळकर, समाधान शेळके तसेच जवान अनिल पांढरे, चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले, मंगेश मारसिंग आणि स्वप्निल अरमाळ यांनी सहभाग घेतला.
0 Comments