Advertisement

Responsive Advertisement

नऊ वर्षे बॉम्ब शोधक पथकाची विश्वासू साथीदार! ‘मिरा’ श्वान सेवेतून निवृत्त! सोलापूर पोलिसांकडून सन्मानपूर्वक निरोप; पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सोहळा

सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अत्यंत विश्वासू आणि कर्तव्यदक्ष सहकारी असलेल्या ‘मिरा’ या श्वानाने तब्बल नऊ वर्षांची सेवा पूर्ण केली. शुक्रवारी (दि.१३ नोव्हेंबर) पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात मिराला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

सन २०१७ मध्ये सोलापूर शहराच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात दाखल झालेल्या मिराने महाराष्ट्रातील पहिल्या बेल्जियन शेफर्ड प्रजातीच्या श्वानांमध्ये स्थान मिळवले होते. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मिळणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या धमक्या, महत्त्वाच्या ठिकाणांचा बंदोबस्त आणि संवेदनशील परिसरात स्फोटकांचा शोध घेण्याची जबाबदारी तिने अत्यंत तत्परतेने पार पाडली.

मिराने आपल्या कामगिरीच्या जोरावर अनेक पुरस्कारही मिळवले. २०१८ आणि २०१९ मध्ये MSPDM अंतर्गत आयोजित स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तिने सुवर्णपदक पटकावले. तसेच लखनौ येथे झालेल्या AIPDM प्रशिक्षणादरम्यानही तिने उल्लेखनीय कामगिरी केली होती.

सोलापूर शहरासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, धार्मिक कार्यक्रम, संवेदनशील ठिकाणे आणि गर्दीच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मिराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या बंदोबस्ताच्या वेळी तिची उपस्थिती पोलिसांसाठी मोठा आधार ठरली.
नऊ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मिरा आता निवृत्त झाली असली, तरी तिच्या देखभालीची जबाबदारी तिच्या हँडलरकडे सोपविण्यात आली आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार निवृत्त श्वानांच्या देखभालीसाठी आवश्यक आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.

या सेवापूर्ती सोहळ्यास पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोजकुमार यादव, दिलीप पवार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि श्वान पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि विश्वास यांचे प्रतीक ठरलेल्या मिराने नऊ वर्षे पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोलाचे योगदान दिले. तिच्या या उल्लेखनीय सेवेचा गौरव करत पोलिसांनी तिला भावपूर्ण आणि सन्मानपूर्वक निरोप दिला.

Post a Comment

0 Comments