Advertisement

Responsive Advertisement

चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानातून तब्बल २.५ टन कचरा संकलित ! दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता श्रमदान अभियान; सामाजिक संस्था व नागरिकांना सहभागी होण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

पंढरपूर - प्रतिनिधी : पंढरपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसराला स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषद आणि होडी चालक-मालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातून तब्बल २.५ टन कचरा संकलित करण्यात आला. या उपक्रमात विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

चंद्रभागा वाळवंट परिसरात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवक, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष श्रमदान करून प्लास्टिक, कचरा तसेच इतर घनकचरा संकलित केला. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली.

या अभियानाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नगरपरिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

दर बुधवारी स्वच्छता व श्रमदान अभियान!

पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने आता दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता नियमित स्वच्छता व श्रमदान अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानात शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे आणि इच्छुक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी.

स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूरचा संकल्प!

पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी व निर्मळ ठेवणे ही केवळ नगरपरिषदेचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून 'स्वच्छ पंढरपूर – सुंदर पंढरपूर' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments