महापौर विनायक कोंड्याल यांनी तिकीट काढून केला बसप्रवास; किमान तिकीट अवघे १० रुपये
सोलापूर - प्रतिनिधी : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूरकरांसाठी आधुनिक, वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवेची भेट देण्यात आली. प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या २० बसेसपैकी १८ बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापौर विनायक रामकृष्ण कोंड्याल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिका मुख्यालय परिसरातील कै. अप्पासाहेब वाराद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. इलेक्ट्रिक बसेसचे विधिवत पूजन करून हिरवा झेंडा दाखविण्यात आला आणि बससेवा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आली.
महापौरांनी तिकीट काढून घेतला बसप्रवासाचा अनुभव
बससेवेचा शुभारंभ झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी उपमहापौर, सभागृह नेते, विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांसमवेत प्रत्यक्ष तिकीट काढून इलेक्ट्रिक बसमधून प्रवास केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गाने प्रवास करून सर्वजण पुन्हा महानगरपालिका मुख्यालयात दाखल झाले.
यावेळी महापौर व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बसमधील वातानुकूलित सुविधा, प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आधुनिक बससेवेची पाहणी करताना पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
वातानुकूलित बसचे किमान तिकीट केवळ १० रुपये
प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात २० बसेस प्राप्त झाल्या असून त्यापैकी १८ बसेस प्रवासी सेवेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत, तर दोन बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे या सर्व बसेस वातानुकूलित असून त्यांचे किमान तिकीट केवळ १० रुपये ठेवण्यात आले आहे. प्रवासाच्या अंतरानुसार पुढील तिकीट दर आकारले जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात एसी बसमधून आरामदायी प्रवास करता येणार आहे.
शहरातील ९ आणि ग्रामीण भागातील ७ मार्गांवर धावणार बसेस
सोलापूर शहरातील ९ आणि ग्रामीण भागातील ७ अशा एकूण १६ मार्गांवर या इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवेचे दोन सत्रांत नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत, तर दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहणार आहे.
या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत वायू प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही आधुनिक आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा : महापौर विनायक कोंड्याल
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून पहिल्या टप्प्यातील १८ बसेस दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक, वातानुकूलित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे एसी बसचे किमान तिकीट केवळ १० रुपये असल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बससेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि प्रदूषण नियंत्रणास मदत होईल. सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील राहील, असेही महापौरांनी सांगितले.
पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती
या कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणीताई तळवलकर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, मंडई व उद्यान समिती सभापती राजशेखर पाटील, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक मेघनाथ येमूल, प्रशांत पल्ली, बिजू प्रधाने, सात्विक बडवे, युवराज सरवदे, ऋषिकेश मेटे, सिद्धेश्वर कमटम, अक्षय अंजीखाने, जयकुमार माने, सत्यनारायण गुर्रम, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेवक व्यंकटेश कोंडी, शिवाजी तात्या वाघमोडे, भारतसिंग बडूरवाले, दीपक तसेच नगरसेविका विजया खरात यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही इलेक्ट्रिक बससेवा सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणातील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि परवडणारा प्रवास उपलब्ध होणार आहे.
0 Comments