Advertisement

Responsive Advertisement

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई परिस्थितीचा आढावा बैठक संपन्न! सांगोला तालुक्यातील 100 टक्के ग्रामपंचायतींनी अभियानात सहभागी व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

सांगोला - प्रतिनिधी : पंचायत समिती सांगोला येथे जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 (सन 2026-27) तसेच टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 100 टक्के सहभाग नोंदवून अभियानातील आठही घटकांनुसार प्रभावी व गुणवत्तापूर्ण कामकाज करण्याचे निर्देश दिले. अभियान यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीदेखील आपल्या गणातील अथवा गटातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी अभियानाच्या अनुषंगाने विविध योजनांचे अभिसरण करून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. मागील वर्षी सांगोला तालुक्याने अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केली असून, ग्रामपंचायत चिनके यांना जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांचे अभिनंदन केले.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. अद्याप घरकुल बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांना नोटीस बजावून विहित कार्यवाही करावी तसेच नियमानुसार सुरू न झालेली घरकुले रद्द करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.

यावेळी नूतनीकरण करण्यात आलेल्या गटविकास अधिकारी यांच्या कक्षाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कक्षाची पाहणी करण्यात आली.

बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भोपळे रोड, सांगोला येथील शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मेडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. पुढे बुरलेवाडी येथील टँकर भरणा पॉईंटची पाहणी करण्यात आली. यावेळी टँकरद्वारे होणारे पाणी वितरण व्यवस्थित व नियोजनबद्ध पद्धतीने करण्याबाबत पाणीपुरवठा विभागास आवश्यक सूचना  देण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, दादासाहेब लवटे, केराप्पा पांढरे, योगेश खटकाळे, पंचायत समिती उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बंडगर, बापू जावीर, डॉ. सुदर्शन इंगवले, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता नितीन करवते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर, विस्तार अधिकारी (पंचायत) अमोल तोडकरी, आत्माराम कोळी, बाबासाहेब खटकाळे, पुंडलिक गंगदे, अजित देशमुख, महेश जाधव आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 च्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासोबतच जलसंधारण, पाणीपुरवठा व टंचाई निवारणाच्या कामांना अधिक गती देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments