पंढरपूर - प्रतिनिधी : पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत शहरातील सफाई कामगारांना हक्काचे घर देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील २१३ सफाई कामगारांना प्रत्येकी ६०० चौरस फुटांचे घर देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात यासाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक सफाई कामगाराला स्वतःच्या हक्काच्या घरात राहता यावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
दिवाळीनिमित्त पंढरपूर येथे सफाई कामगारांसोबत फराळाचा कार्यक्रम आणि त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, माजी आमदार प्रशांत परिचारक, कामगार नेते गुरु देवडी, दिग्विजय बागल, समाधान देशमुख, दिलीप धोत्रे, नगरसेवक अनिल सावंत, नागेश भोसले, तहसीलदार सचिन लंगोटे, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले की, अतिरिक्त १५० सफाई कामगारांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून संबंधित कामगारांना दिवाळीची भेट द्यावी. यामध्ये काही अडचणी असल्यास त्या दूर करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे.
पंढरपूरची आषाढी वारी स्वच्छ आणि सुंदर वारी म्हणून महाराष्ट्रासह देशात आणि जागतिक स्तरावर ओळख निर्माण करीत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून वारीदरम्यान करण्यात येणाऱ्या स्वच्छतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामध्ये सफाई कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आषाढी वारीच्या काळात सफाई कामगारांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे पंढरपूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मोठी मदत झाली. या कामाचे कौतुक मुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून आपले होत असले, तरी या यशाचे खरे शिलेदार सफाई कामगारच आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही सफाई कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना हक्काची घरे लवकरात लवकर मिळावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिराज उबाळे यांनी केले. त्यांनी २००७ पासून सफाई कामगारांच्या परिस्थितीचा आढावा घेत त्यांच्या विविध समस्या मांडल्या. तसेच कामगारांना हक्काची घरे मिळावीत, अशी मागणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने महिला सफाई कामगारांना भाऊबीजेची भेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आली. तसेच पुरुष सफाई कामगारांनाही दिवाळी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी सफाई कामगारांसोबत दिवाळीचा फराळ घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला कामगारांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे औक्षण करून स्वागत केले.
याशिवाय, जयाभाऊ क्रिकेट स्पर्धेत ४०-१६ या संघाने प्रथम पारितोषिक पटकावल्याबद्दल पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.
सफाई कामगारांच्या अनेक वर्षांच्या घराच्या मागणीला ५६ कोटींच्या निधीमुळे बळ मिळाले असून, हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने पंढरपूरने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
0 Comments