Advertisement

Responsive Advertisement

बोनसपासून वंचित ६० परिवहन कर्मचाऱ्यांनाही बोनस द्या; महापौर विनायक कोंड्याल यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील बोनसच्या यादीतून वगळण्यात आलेल्या ६० कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस देण्याबाबत महापौर विनायक रामकृष्ण कोंड्याल यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच बोनसपासून वंचित राहिलेल्या ६० कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या मागणीची दखल घेत महापौर कोंड्याल यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि मुख्यालय अधिकारी रत्नराज जवळगीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

सणासुदीच्या काळात कोणताही कर्मचारी बोनसच्या लाभापासून वंचित राहू नये, सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळावा, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या ६० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

यावेळी कामगार नेते अशोक जानराव, एम. एम. तांबोळी, लखन बंडगर, तानाजी मल्लव, सुरेश नवगिरे, मुकेश गायकवाड, रेवण स्वामी, विनोद सरवदे, भारत शिरसागर, सादिक खैरादी आदी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्याबद्दल शिष्टमंडळाने महापौरांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments