सोलापूर - प्रतिनिधी : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली. १० किलोमीटरची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नागनाथ मंदिर (अकोलेकाठीकडे जाणारा रस्ता) ते वडाळा या मार्गावर ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेला तरुण-तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अकोलेकाठी व वडाळा परिसरातील विविध अकॅडमीमधील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी स्वतः धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होत स्पर्धकांचा उत्साह वाढविला.
मुलांच्या गटात आदेश चव्हाण प्रथम
स्पर्धेच्या मुलांच्या गटात आदेश चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावत ५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र मिळविले. पांडुरंग सूर्यवंशी याने द्वितीय क्रमांक मिळवत ३ हजार रुपये, तर बाळासो पाटील याने तृतीय क्रमांक मिळवत २ हजार रुपये व प्रमाणपत्र पटकाविले.
मुलींच्या गटात रिया शिंदेची बाजी
मुलींच्या गटात अवघ्या १३ वर्षांच्या रिया शिंदे हिने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. तिला ५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ९ वर्षीय रिया खलाटे हिने द्वितीय क्रमांक पटकावत ३ हजार रुपये, तर वृषाली बनसोडे हिने तृतीय क्रमांक मिळवत २ हजार रुपये व प्रमाणपत्र मिळविले.
सर्व विजेत्या धावपटूंना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ही मिनी मॅरेथॉन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार पडली.
यावेळी अकोलेकाठी व वडाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
खेळाच्या माध्यमातून युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत समाजात जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
0 Comments