सोलापूर - प्रतिनिधी : शहरातील नागरी सुविधा, विकासकामे आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वाहन ताफ्यात सात नवीन बोलेरो वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून ही वाहने थेट खरेदी करण्यात आली आहेत. या खरेदीसाठी महापालिकेने एकूण ५३ लाख ८३ हजार ६०९ रुपये खर्च केले आहेत.
महापालिकेच्या ‘इंद्रभुवन’ परिसरात महापौर विनायक कोंड्याल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते सातही वाहनांचे विधिवत पूजन करण्यात आले. एका वाहनाची किंमत ७ लाख ६९ हजार ८७ रुपये आहे.
नागरी सेवांना मिळणार गती
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, विद्युत आणि बांधकाम यांसह विविध विभागांच्या दैनंदिन कामकाजासाठी वाहनांची आवश्यकता होती. शहरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करणे, तातडीच्या कामांसाठी घटनास्थळी पोहोचणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे.
नवीन वाहनांमुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना विविध भागांत पोहोचणे अधिक सोयीचे होणार असून, प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढण्यास मदत होईल. परिणामी नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिकारी व पदाधिकारी उपस्थित
या वाहन पूजन कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पृथ्वीराज कोंड्याल, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, नगर अभियंता नीलकंठ मठपती, वाहन विभाग प्रमुख गिरीश पुकाळे, मुन्ना तळीखडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments