बालकांचे संरक्षण, हक्कांची जपणूक आणि पीडित बालकांच्या पुनर्वसनासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

सोलापूर - प्रतिनिधी : बालकांना पोलीस ठाण्यात सुरक्षित, विश्वासार्ह आणि बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच बालकांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांच्यावरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने सोलापुरात पोलीस अधिकारी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती, सोलापूर आणि निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामीण पोलीस मुख्यालयातील संवाद हॉल येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना निर्माण संस्थेचे प्रकल्प समन्वयक रवी पवार यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पोलीस ठाण्यात सुरक्षित व विश्वासाचे वातावरण मिळावे आणि बालहक्कविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या सकारात्मक उद्देशाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बालकांचे बालपण सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी

प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना बालकांचे बालपण सुरक्षित ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचे आणि संपूर्ण समाजाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत आवश्यक आहे. बालकांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य जपण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने सजगतेने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील विविध तरतुदींची माहिती दिली. तसेच पीडित बालकांचे पुनर्वसन, समुपदेशन आणि त्यांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय व अशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली.

POCSO कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन

दुसऱ्या सत्रात मुस्कान संस्थेच्या बालहक्क प्रशिक्षक दीपली दंडवते यांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ या कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर तरतुदी, बालकांशी संवेदनशीलतेने संवाद साधण्याची पद्धत आणि बालस्नेही पोलीस यंत्रणेची भूमिका याविषयी माहिती देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रशिक्षण कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात आणि जिल्हा संरक्षण अधिकारी नागनाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी निर्माण संस्थेच्या संस्थापक सदस्य वैशाली भांडवलकर, अँ.अनिता कळके, कविता सूर्यवंशी, सुषमा कांबळे, नितीन शिंदे आणि कल्पना साबे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान सुरवसे यांनी केले, तर कार्यक्रम समन्वयक शाहरुख मुजावर यांनी आभार मानले.

बालकांचे हक्क, संरक्षण आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था, महिला व बाल विकास विभाग आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला.