Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेत आणखी सुधारणा करा; प्रवाशांना सुविधा प्राधान्याने द्या!परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश; बसस्थानकाची केली पाहणी

सोलापूर – प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक सुविधांच्या पूर्ततेला प्राधान्य द्यावे. तसेच बसस्थानकाच्या स्वच्छतेत आणखी सुधारणा कराव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी ३ नोव्हेंबर रोजी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहे, पाणपोई तसेच अन्य प्रवासी सुविधांची पाहणी केली. बसस्थानकात झालेल्या सुधारणांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत आणखी सुधारणा करण्यास वाव असून, बसस्थानक परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या. एसटीच्या नवीन बसेसबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशाच दर्जेदार सुविधा आणि सेवा मिळाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली. यावेळी प्रवाशांनी स्थानिक समस्याही मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. दोन प्रमुख शहरांदरम्यान विनावाहक बससेवा सुरू करण्याची मागणीही प्रवाशांनी केली.

प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि समाधानासाठी एसटी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवाशांना उत्तम सुविधा, स्वच्छ बसस्थानके आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देणे हे एसटी महामंडळाचे प्राधान्य आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी स्थानिक प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Post a Comment

0 Comments