Advertisement

Responsive Advertisement

५ नोव्हेंबरला सोलापुरात ‘आरोग्य संवाद यात्रा’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साधणार जनतेशी थेट संवाद सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा घेणार आढावा; आरोग्यसेवेतील त्रुटी दूर करण्यावर भर

सोलापूर - प्रतिनिधी : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा सोलापूर जिल्ह्यातील टप्पा ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडणार असून, या माध्यमातून आरोग्यमंत्री आबिटकर जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.

१ नोव्हेंबर रोजी नांदेड येथून या यात्रेचा शुभारंभ झाला असून, ५ डिसेंबर २०२६ पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेणे, आरोग्य यंत्रणेतील त्रुटी शोधणे आणि त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

३५ दिवसांची यात्रा; १० लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाशी या यात्रेची सांगड घालण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांमध्ये ग्रामपातळीवरील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा

शासकीय आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कितपत पोहोचतो, आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि रुग्णसेवा देताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याची प्रत्यक्ष माहिती या यात्रेदरम्यान घेतली जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २ ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. आरोग्य उपकेंद्रांपासून जिल्हास्तरीय रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, स्त्री रुग्णालये, मनोरुग्णालये आणि विशेष रुग्णालयांपर्यंतच्या आरोग्य सेवांची पाहणी करण्यात येणार आहे.

१२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण

या आरोग्य संवाद यात्रेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, विधानसभा मतदारसंघ समिती, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती किंवा ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती यांपैकी एका समितीसोबत बैठक घेऊन आरोग्यविषयक प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शाळा आणि अंगणवाड्यांना भेटी देऊन या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्मान भारत) अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांना भेट देऊन खासगी डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधण्यात येणार आहे.

विविध आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद

यात्रेदरम्यान पॅलिएटिव्ह केअर, सिकलसेल आजार, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग व कुष्ठरोग रुग्ण, जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी, कर्करोग तपासणीतील रुग्ण तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.

औषधसाठा, उपकरणे आणि मनुष्यबळाचीही तपासणी

या ३५ दिवसांच्या यात्रेदरम्यान राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील औषधसाठा, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या, स्वच्छता, रुग्णालय व्यवस्थापन आणि उपचार सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे.

नागरिक, रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत. या सूचनांच्या आधारे आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

या यात्रेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या आरोग्य संवाद यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवून ती यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments