Advertisement

Responsive Advertisement

अवैध सावकारीविरोधात नागरिकांनी तक्रार करावी : जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे ४ जणांच्या घरांची झडती; सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात प्रशासनाची कारवाई !

सोलापूर – प्रतिनिधी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून खाजगी सावकारांनी सक्तीने कर्जवसुली करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले आहेत. तरीही जिल्ह्यात कुठेही खाजगी सावकारांकडून धमकी देऊन किंवा बळाचा वापर करून कर्जवसुली केली जात असल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि कर्जवसुलीसाठी त्यांच्यावर कोणताही अनुचित दबाव आणला जाऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मुकुंद पवार यांनी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये तालुका सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमध्ये सहकार विभागातील अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. अवैध सावकारीला आळा घालणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखणे, हा या पथकांचा उद्देश आहे.

सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने २ नोव्हेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम, २०१४ मधील कलम १६ अन्वये करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान सागर जनार्दन कोळेकर, सचिन मारुती पाटील (खरात), रणजित आजिनाथ कोळेकर आणि महेश गलांडे या चार जणांच्या घरांची झडती घेण्यात आली.

सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात तक्रार करा

जिल्ह्यात कुठेही अवैध सावकारी होत असल्याची माहिती नागरिकांकडे असल्यास किंवा सावकारांकडून धमकी, दबाव अथवा सक्तीने कर्जवसुली केली जात असल्यास संबंधित तालुक्याच्या सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा. नागरिकांनी अवैध सावकारीला बळी न पडता प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments