सोलापूर - प्रतिनिधी : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आदिवासी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटांना निवडपत्र व धनादेश वितरण करण्यात आले. तसेच आदिवासी नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी म्हणाले की, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ समाजातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि महिला बचत गटांसाठी असलेल्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी.
आदिवासी समाजातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त त्यांनी सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील गडचिरोली येथे हा कार्यक्रम संपन्न होत असल्याबद्दल आनंद व अभिमान व्यक्त केला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे, आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास जतन करून तो सर्वांपर्यंत पोहोचविणे, समाजाचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक सक्षमीकरण करणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प संचालक धनंजय झाकर्डे यांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील आदिवासी समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आदिवासी पारधी समाजातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी ३ आश्रमशाळा, एक सैनिक शाळा, २ नामांकित शाळा आणि ६ वसतिगृहे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रकल्प संचालक धनंजय झाकर्डे, कार्यालय अधीक्षक सुधाकर भांगरे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रदीप समुद्रे, आदिवासी समाजातील वैजू काळे, राजेश काळे, ज्ञानेश्वर भोसले, चव्हाण, ॲड. बबीता काळे, सामाजिक कार्यकर्त्या पार्वती काळे, ॲड. नितीन शिंदे, शाहीर शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करत आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून देण्यात आला.
0 Comments