Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर तालुका पोलिसांच्या डी.बी. पथकाची मोठी कारवाई

मोटारसायकल चोरट्याला जेरबंद; ९ दुचाकी हस्तगत

सोलापूर (प्रतिनिधी) : मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आंतरजिल्हा तसेच आंतरराज्य स्तरावर सक्रिय असलेल्या सराईत चोरट्याला सोलापूर तालुका पोलिसांच्या डी.बी. पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून चोरीच्या तब्बल ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे सोलापूरसह धाराशिव, अहिल्यानगर आणि कर्नाटकातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, मुळेगाव तांडा परिसरात एक संशयित इसम मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सत्यवान रामहरी भोसले (वय ३४, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याच्याकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता, ती चोरीची असल्याचे समोर आले. पुढील तपासात सदर मोटारसायकल सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ३०५/२०२४, बीएनएस कलम ३०३(२) मधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीला अटक करून पोलीस कोठडीदरम्यान सखोल चौकशी केली असता, त्याने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. त्याच्या ताब्यातून सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर तसेच गुलबर्गा (कर्नाटक) येथून चोरीस गेलेल्या एकूण ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.

या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पुढे जाण्यास मदत झाली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सोलापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांजेकर, पोलीस हवालदार धनराज गायकवाड, राहुल महिंद्रकर, नागेश वाघमोडे, शशिकांत कोळेकर, पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ, फिरोज बारगीर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निखिल पवार सहभागी होते.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार धनराज गायकवाड करीत आहेत.

Post a Comment

0 Comments