Advertisement

Responsive Advertisement

‘AI आणि माध्यमांची भूमिका’वर सोलापूर विद्यापीठात विशेष मार्गदर्शन सत्र

“स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वतःच्या मालकीचा दावा करता येईल असा डेटा तयार करा” — प्रा. डॉ. योगेश बोराटे

सोलापूर - प्रतिनिधी : “आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी स्वतःच्या मालकीचा दावा करता येईल असा डेटा तयार करणे आवश्यक आहे,” असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील मास कम्युनिकेशन विभाग आणि आजी-माजी विद्यार्थ्यांच्या ‘सुसंवाद’ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘AI आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा माध्यम क्षेत्रातील वापर, त्याच्या विविध शक्यता आणि जबाबदार वापर याबाबत मार्गदर्शन केले.

AI मुळे पत्रकारितेतील कामकाज अधिक वेगवान आणि प्रभावी झाले असले तरी पत्रकारांची जबाबदारीही त्याच प्रमाणात वाढली आहे, असे डॉ. बोराटे यांनी नमूद केले. AI चा वापर करताना माहितीची सत्यता पडताळणे, मानवी मूल्ये जपणे आणि सर्जनशीलतेला योग्य दिशा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही आधुनिक तंत्रज्ञानातील महत्त्वाची क्रांती असून तिचा मानवी जीवन, शिक्षण, रोजगार तसेच भावनिक जगावर होणारा परिणाम यावरही कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी AI कडे केवळ तंत्रज्ञान म्हणून न पाहता त्याचा जबाबदारीने आणि सर्जनशीलतेने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. गौतम कांबळे होते. यावेळी माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, प्रभारी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, दैनिक सकाळचे सहसंपादक सिद्धाराम पाटील आणि ‘सुसंवाद’चे अध्यक्ष सोमनाथ पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ‘सुसंवाद’ संघटनेच्या वतीने दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, महानगरपालिकेच्या विधी समितीचे सभापती सत्यजित वाघमोडे आणि ॲग्रोवनचे पत्रकार सुदर्शन सुतार यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी तथा लोकमत सखी मंचच्या हेड मंजुषा दोरकर यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय ‘सुसंवाद’चे प्रमुख संघटक प्रा. डॉ. अंबादास भासके यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘सुसंवाद’चे खजिनदार डॉ. जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सोलापूर विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या २२ व्या युवा महोत्सवात मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत उल्लेखनीय सहभाग नोंदवत पारितोषिके मिळवली. या यशाबद्दल अपूर्वा जाधव, रश्मी मोहोळकर, आयुषी जुनवणे आणि कुणाल बाबरे यांचा ‘सुसंवाद’ विद्यार्थी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या उपस्थितांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, ‘सुसंवाद’ विद्यार्थी संघटना आणि सामाजिक शास्त्रे संकुल, मास कम्युनिकेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.

उपस्थित पत्रकार बंधू-भगिनींसाठी ‘सुसंवाद’ संघटनेतर्फे भोजन तसेच चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मास कम्युनिकेशन विभागातील प्रा. डॉ. तेजस्विनी कांबळे, प्रा. ऋषिकेश मंडलिक, प्रा. विठ्ठल एडके, विद्यापीठाचा स्टुडिओ व इतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

‘सुसंवाद’चे प्रमुख संघटक प्रा. डॉ. अंबादास भासके, अध्यक्ष व सकाळ वृत्तपत्रातील तनिष्का व्यासपीठाचे हेड सोमनाथ पवार, उपाध्यक्ष व ‘द पब्लिक वार्ताहर’चे संपादक विजयकुमार पार्सेकर, सचिव दशरथ कुंभार, खजिनदार डॉ. येवसेप जगताप, सहसचिव व इन चॅनलचे प्रतिनिधी आनंद बिराजदार तसेच इतर सभासदांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

या मार्गदर्शनपर स्नेहसंमेलनास सोलापूर शहर व जिल्ह्यातील पत्रकारितेचे आजी-माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments