Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; प्रत्यक्षात पुढारी कामाला लागले !

सोलापूर - प्रतिनिधी : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीची प्रतीक्षा संपल्याने जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी हालचालींना वेग दिला असून, इच्छुक उमेदवारांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, ३ नोव्हेंबरला पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ नोव्हेंबरपासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. आवश्यक असल्यास १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतदान झाल्यास २७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

प्रशासक नियुक्तीनंतर निवडणुकीकडे लक्ष

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची शेवटची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. त्यानंतर २९ मे २०१८ रोजी संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बँकेच्या संचालक मंडळावर स्थान मिळवण्यासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय गटांतील नेत्यांनी यापूर्वीपासूनच तयारी सुरू केली होती. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढल्या आहेत. सहकार क्षेत्रातील वर्चस्व, राजकीय समीकरणे आणि संभाव्य बिनविरोध निवडी याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगू लागली आहे.

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार काम पाहणार आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल होण्यापासून ते अंतिम निवडीपर्यंत कोणते राजकीय डावपेच रंगणार आणि बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments