Advertisement

Responsive Advertisement

सोलापुरी सुरांचा झेंडा दक्षिण आफ्रिकेत फडकवणार गायक मोहम्मद अयाज !

प्रतिनिधी - सोलापूर : सोलापूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज हे २६ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या सांगीतिक दौऱ्यावर रवाना होत आहेत. आपल्या मधुर आवाजातून भारतीय संगीताची समृद्ध परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा त्यांचा मानस असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोहम्मद अयाज यांनी गझल, भक्तिगीते, देशभक्तिपर गीते तसेच विविध भाषांतील गीतांच्या सादरीकरणातून रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या सुरेल गायनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत.


पद्मविभूषण आशाताई भोसले, अनुराधा पौडवाल, उषाताई मंगेशकर, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, अनुप जलोटा, साधना सरगम, वर्षा उसगावकर आणि सपना अवस्थी यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत त्यांना कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 'महाराष्ट्र श्री सन्मान' तसेच महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाशी संबंधित गौरवही प्राप्त झाला आहे.

विशेष म्हणजे, मोहम्मद अयाज हे सोलापूर जिल्ह्यासाठी 'नशामुक्त भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणूनही कार्यरत आहेत. संगीतासोबतच सामाजिक जनजागृतीच्या क्षेत्रातही ते आपले योगदान देत आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील या सांगीतिक दौऱ्याच्या माध्यमातून भारतीय संगीताची सांस्कृतिक परंपरा तेथील भारतीय समुदायापर्यंत तसेच स्थानिक संगीतप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा अयाज यांचा प्रयत्न असणार आहे. या दौऱ्यामुळे भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधिक व्यापक ओळख मिळवून देण्याची संधी निर्माण होणार आहे.

सोलापूरच्या मातीतून पुढे आलेल्या मोहम्मद अयाज यांची ही आंतरराष्ट्रीय भरारी सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल संगीतप्रेमी, चाहते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments