सोलापूर - प्रतिनिधी : शासकीय बिलाच्या मंजुरीवरून झालेल्या वादातून दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रोजगार हमी योजना (रोहयो) विभागात कंत्राटी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या राहुल शांतिकुमार गायकवाड (रा. अभिषेक नगर, मुरारजी पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्याच्या मागणीवरून संबंधित व्यक्तीने उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन वाद घातल्याचा आरोप आहे. आठ दिवसांत पैसे दिले नाहीत, तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना संपवून टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बनावट स्वाक्षऱ्या करून बिले काढल्याचा आरोप
तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बिले काढल्याचा आरोपही संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात वाहनांशी संबंधित कंत्राटी कामे मिळवून त्यांची बिले सादर केल्यानंतर पुन्हा कथित बोगस बिले सादर केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आल्याची माहिती आहे. या बिलांच्या मंजुरीवरूनच तहसीलदार आणि संबंधित व्यक्ती यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पत्नीच्या निलंबनावरूनही वाद?
संबंधित व्यक्तीची पत्नी कोतवाल म्हणून कार्यरत होती. तिच्याविरोधात ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिल्यानंतर सुनावणी घेऊन तहसीलदारांनी तिला निलंबित केले होते. या कारवाईचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने निवडणुकीच्या कामकाजादरम्यान गोंधळ घातला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असाही आरोप फिर्यादीत करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून पुढील तपास
या प्रकरणी सदर बझार पोलिसांनी आरोपीला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहुल सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणातील बनावट स्वाक्षऱ्या, कथित बोगस बिले आणि धमकीच्या आरोपांबाबतचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
0 Comments