सोलापूर - प्रतिनिधी : गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचा पहिला दीक्षांत समारंभ रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता केगाव, सोलापूर येथील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात विविध अभ्यासक्रमांतील एकूण ९० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या दीक्षांत समारंभाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे आणि कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या समारंभात बीसीए (२०२३-२०२६), एमबीए आणि एमसीए (२०२३-२०२५ व २०२४-२०२६) या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या दूरदृष्टीतून १९८३ मध्ये पुणे येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशनल रिसर्च (माईर्स) या संस्थेने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चार दशकांहून अधिक काळाची शैक्षणिक परंपरा पुढे नेणारे एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे २०२३ मध्ये सोलापूर येथे स्थापन झालेले माईर्स एमआयटी समूहाचे पाचवे विद्यापीठ आहे.
उद्योगक्षेत्राशी समन्वय, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित अध्ययन आणि नवोपक्रमाभिमुख अध्यापन पद्धती यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविण्यावर विद्यापीठाचा भर आहे. शैक्षणिक गुणवत्ता, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, सर्वसमावेशकता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धन या मूल्यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन असलेले आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक घडविण्याचे उद्दिष्ट विद्यापीठाने ठेवले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा पहिला दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. प्राणेश मुरनाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
0 Comments