सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूरच्या सार्वजनिक परिवहन सेवेची दुरवस्था पाहून माजी डेप्युटी आरटीओ राजेंद्र मदने (बापू) यांनी पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आप्पाजी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागाला दोन बस मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या बस विडी कामगारांच्या सोयीसाठी नीलमनगर ते कन्ना चौक या मार्गावर धावणार असून, बससेवेसाठी लागणारा डिझेल खर्च आणि चालकांची जबाबदारीही फाउंडेशन उचलणार आहे.
राजेंद्र मदने यांनी २००७ मध्ये सोलापुरात डेप्युटी आरटीओ म्हणून सेवा बजावली. त्यानंतर २००९ पर्यंतच्या काळात त्यांनी महापालिका परिवहन व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिका परिवहन सेवेला उभारी देत कर्जमुक्त आणि स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर एसएमटीची परिस्थिती पुन्हा खालावत गेली.
आज सोलापुरात एसएमटीच्या बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने सामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडे पुरेशा बस आणि आवश्यक यंत्रणेचा अभाव असल्याने सार्वजनिक परिवहन सेवा अडचणीत आली आहे. अलीकडेच केंद्र शासनाच्या योजनेतून बॅटरीवर चालणाऱ्या बस दाखल झाल्या असल्या, तरी त्यांची सेवा अद्याप सुरू झालेली नाही.
ही परिस्थिती पाहून राजेंद्र मदने यांनी आप्पाजी फाउंडेशनच्या माध्यमातून दोन बस उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे सादर केला. सोलापूरच्या प्रवासी सेवेची गरज लक्षात घेऊन आयुक्तांनी या प्रस्तावाला तातडीने मान्यता दिली. फाउंडेशनने स्वतः बस खरेदी केल्या असून, बससेवेसाठी चालक आणि डिझेलचा खर्चही उचलण्याची तयारी दर्शविली आहे.
बससेवा सुरू करण्यापूर्वी चालकांची पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत चारित्र्य पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात फाउंडेशनने महापालिकेशी पत्रव्यवहारही केला आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर ही मोफत बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.
१७ वर्षांनंतरही सोलापूरशी नाळ कायम !
सोलापुरात अनेक अधिकारी आले आणि गेले; मात्र आपल्या कामाचा ठसा उमटविणारे काही अधिकारी आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत. त्यापैकी राजेंद्र मदने यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बदली झाल्यानंतरही त्यांनी सोलापूरशी आपले नाते कायम ठेवले. काही वर्षांपूर्वी त्यांनी दिवाळी विडी कामगारांसोबत साजरी करून सामाजिक बांधिलकी जपली होती. आता एसएमटीची दुरवस्था पाहून त्यांनी पुन्हा एकदा सोलापूरकरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
उद्योजकांनीही पुढाकार घेण्याची गरज
सोलापुरात अनेक मोठे उद्योजक आणि औद्योगिक संस्था आहेत. त्यांनीही सीएसआर (CSR) निधीच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक परिवहन सेवेला मदत केल्यास सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. राजेंद्र मदने यांनी घेतलेला हा पुढाकार इतर उद्योजक आणि सामाजिक संस्थांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
0 Comments