मंद्रूप - प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज-मंद्रूप गावालगत असलेल्या भीमा नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांनी धडक कारवाई करत एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण १९ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अयाज जाफरसो पाटील (वय ४५, रा. औज-मंद्रूप) याच्यासह अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ ते ६.५० वाजण्याच्या सुमारास औज-मंद्रूप गावालगतच्या भीमा नदीपात्रात विनापरवाना वाळू उपसा करण्यात आल्याचा आरोप आहे. वाळू ही सरकारी मालमत्ता असून, बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याची जाणीव असतानाही संबंधितांनी वाळू उपसा केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी किरण दशरथ कोठुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ९ आणि १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी कारवाईदरम्यान सुमारे ९ लाख रुपये किमतीचा पिवळ्या रंगाचा विनाक्रमांक जेसीबी, ५ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर, ५ लाख रुपये किमतीचा निळ्या रंगाचा सोनालिका ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १३ डीएम ३१०८) आणि ६ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण १९ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बिराजदार करीत आहेत.
अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
भीमा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर वाळू उत्खननाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नदीपात्राचे होणारे नुकसान आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी अशा अवैध उत्खननावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
0 Comments