यावली शाळेला 'क' किंवा 'ब' वर्गात आणण्याचे उद्दिष्ट; अनगर आरोग्य केंद्राची पाहणी, चिंचोली काटी येथे घरकुल लाभार्थ्याची घेतली भेट
मोहोळ - प्रतिनिधी : ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासह आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे आणि शासकीय घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत मोहोळ तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि घरकुल योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावली शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न
दौऱ्याची सुरुवात यावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भेटीने झाली. सध्या 'ड' वर्गात असलेल्या या शाळेचा दर्जा सुधारून 'क' किंवा 'ब' वर्गापर्यंत उंचावण्याचे उद्दिष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शिक्षकांसमोर ठेवले. यासाठी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची प्रगती आणि आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी शिक्षकांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या ग्रुप अँक्टिव्हिटी, शैक्षणिक उपक्रम आणि अध्ययन-अध्यापन पद्धतींची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि कृतीतून शिकण्याची आवड निर्माण करावी, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी नियोजनबद्ध प्रयत्न करून शाळेच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडवून आणावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
अनगर आरोग्य केंद्रातील सुविधांची तपासणी
यानंतर अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. ऑपरेशन थिएटर, औषधसाठा, प्रयोगशाळेतील तपासणी सुविधा तसेच आरोग्य केंद्रातील विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला. उपलब्ध मनुष्यबळ, दैनंदिन कामकाज, आरोग्य सुविधांची स्थिती आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती जाणून घेतली.
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर करून आरोग्य केंद्रातील सेवा अधिक सक्षम कराव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
चिंचोली काटी येथे घरकुल लाभार्थ्याची भेट
दौऱ्याच्या पुढील टप्प्यात चिंचोली काटी येथे घरकुल योजनेच्या लाभार्थ्याच्या निवासस्थानी जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी घरकुल बांधकामाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि शासकीय योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे की नाही, याची पाहणी केली.
घरकुल योजनांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे. यासाठी संबंधित यंत्रणेने नियमित पाठपुरावा करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्यातून ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि निवास या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रयत्न दिसून आला.
यावेळी मोहोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक आणि विस्तार अधिकारी नागसेन कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0 Comments