Advertisement

Responsive Advertisement

‘थांबा, विचार करा आणि मगच क्लिक करा’ ; सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी पत्रकारांना मार्गदर्शन, सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय व क्राइम पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम; ७५ ते ८० पत्रकारांचा सहभाग


सोलापूर - प्रतिनिधी : ‘सजगता, सतर्कता आणि काळजी’ हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी शेअर करणे किंवा आमिषाला बळी पडून ऑनलाइन गुंतवणूक करणे टाळा. कोणतीही कृती करण्यापूर्वी थांबा, विचार करा आणि मगच क्लिक करा, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय आणि क्राइम पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पोलिस आयुक्तालयात पत्रकारांसाठी सायबर जनजागृती व सायबर गुन्हेविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत शहरातील ७५ ते ८० पत्रकार सहभागी झाले होते.

यावेळी पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, क्राइम पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भांगे, ज्येष्ठ पत्रकार ओम शंकर हुलगेरे, भरतकुमार मोरे, विनायक होटकर आदी उपस्थित होते. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीपासून सावध राहा

कार्यशाळेत डिजिटल अरेस्ट, सेक्स्टॉर्शन, ओटीपी व पासवर्डची चोरी, बनावट केवायसी संदेश, शेअर बाजारातील गुंतवणुकीवर अवास्तव परताव्याचे आमिष, बनावट पोलिस अधिकारी बनून धमकावणे, गॅस बिल भरण्याचे खोटे संदेश आणि इन्स्टंट लोन ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर तज्ज्ञ अविनाश पाटील, महिला पोलिस अंमलदार प्रांजली काळे आणि पोलिस अंमलदार सचिन आंबलगी यांनी प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे देत सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. अनोळखी क्रमांकावरून आलेले संदेश, संशयास्पद लिंक आणि व्हॉट्सॲपवरील अनधिकृत मजकुरावर क्लिक करू नये. एका चुकीच्या क्लिकमुळे मोबाईलमधील वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

बँक खात्यांची माहिती, छायाचित्रे, आधारकार्ड व अन्य ओळखपत्रांचा गैरवापर करून बनावट खाती उघडणे आणि आर्थिक फसवणूक करणे असे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी आपली वैयक्तिक व आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले.
फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधा

ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न दवडता तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा. त्वरित तक्रार केल्यास फसवणुकीतून हस्तांतरित झालेली रक्कम रोखण्यासाठी किंवा गोठवण्यासाठी प्रयत्न करता येतात, असे पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. क्राइम पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार इम्रान सगरी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments