Advertisement

Responsive Advertisement

सोलापूर ग्रामीण पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त ! टेंभुर्णीत MD ड्रग्जसह एकाला अटक; रांजणीत शेतातून गांजा जप्त


सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात धडक मोहीम राबवत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये २५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. टेंभुर्णी येथे MD ड्रग्जसह एका आरोपीला अटक करण्यात आली, तर पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात शेतातून गांजा जप्त करण्यात आला. या कारवायांमुळे अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

टेंभुर्णीत MD ड्रग्जसह आरोपीला अटक

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्डुवाडी पुलाजवळ स्थानिक गुन्हे शाखेने पहिली कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या पथकाला गौतम अजित भोसले हा किया सेल्टोस कारमधून MD ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित कार अडवली आणि गौतम अजित भोसले (वय ३८, रा. वेणेगाव, ता. माढा) याला ताब्यात घेतले.

आरोपीकडून ५.५२ ग्रॅम MD ड्रग्ज, किया सेल्टोस कार, दोन मोबाईल, वजनकाटा, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण २१ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने अन्य दोन साथीदारांसह ओडिशा येथे जाऊन अंमली पदार्थ आणल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे करीत आहेत.

रांजणी गावात शेतातून गांजा जप्त

दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात स्थानिक गुन्हे शाखा आणि पंढरपूर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पंकेश मोहन दांडगे याच्या घराशेजारील शेताची तपासणी केली असता, कापून भारे बांधून ठेवलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

यंदा NDPS कायद्यान्वये ९१ गुन्हे दाखल

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ पासून जिल्ह्यात NDPS कायद्यान्वये ९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी २५ गुन्ह्यांमध्ये सुमारे २ कोटी ५१ लाख रुपयांचे अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याबरोबरच जनजागृतीवरही भर दिला जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व प्रेरणा कट्टे आणि करमाळा उपविभागाच्या सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, सहायक पोलीस निरीक्षक संजय राठोड, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड व भारत भोसले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, टेंभुर्णी पोलीस ठाणे आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments