मंद्रूप प्रतिनिधी : महापूर आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा गावांतील शेतकरी आता महावितरणच्या सक्तीच्या लोडशेडिंगविरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक विद्युत अभियंता सुनील माने यांना सामूहिक निवेदन दिले.
येत्या दोन ते तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सिंदखेड, चंद्रहाळ, हत्तूर, राजूर, बिरनाळ आणि होणमुर्गी या सहा गावांतील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे आपल्या व्यथा मांडल्या. गेल्या वर्षी शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महापुरामुळे शेतजमिनी, पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर यंदा पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. अशा परिस्थितीत रब्बी ज्वारी हेच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे एकमेव आशास्थान उरले आहे.
सध्या नदीत पाणी उपलब्ध असतानाही महावितरणच्या सक्तीच्या लोडशेडिंगमुळे आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीला वेळेवर पाणी देता येत नाही. दिवसा वीजपुरवठा उपलब्ध नसतो, तर रात्रीच्या वेळी अनियमितपणे वीज येते. वीज वारंवार खंडित होत असल्याने शेतीच्या कामांचे नियोजन कोलमडले असून, विद्युत मोटारी जळण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी, पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतीच्या सिंचनाबरोबरच जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. या सहा गावांतील सक्तीचे लोडशेडिंग तातडीने रद्द करून दिवसा किमान आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या मागणीची तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अमर पाटील यांनी दिला. या वेळी तालुक्यातील सुमारे १०० ते १५० शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
---
चौकट १ : नदीत पाणी असूनही सिंचनात अडथळे
सध्या नदीत पाणी उपलब्ध असतानाही महावितरणच्या सक्तीच्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. वीजपुरवठा कधी सुरू होतो, तर कधी अवघ्या एक-दोन तासांतच खंडित होतो. दिवसा वीज उपलब्ध नसणे आणि रात्री अनियमितपणे वीज येणे, यामुळे शेतीच्या कामांचे नियोजन कोलमडले आहे. या समस्येवर महावितरणने तातडीने उपाययोजना करावी.
— बाळराजे विजापुरे
अध्यक्ष, शिवसेना शाखा सिंदखेड (शिंदे गट)
---
चौकट २ : दोन ते तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करा; अन्यथा रास्ता रोको!
महापूर आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटात सापडलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांना महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. यासंदर्भात अधीक्षक विद्युत अभियंता सुनील माने यांना निवेदन देण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
— अमर र. पाटील
जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)
0 Comments