बोगस कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी पूनम गेटसमोर आक्रोश धरणे आंदोलन
सोलापूर (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करून त्यासाठी स्वतंत्र रकाना ठेवावा, बोगस व बेकायदेशीर कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांची चौकशी करून ती रद्द करावीत, तसेच ओबीसी आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समिती, सोलापूरच्या वतीने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पूनम गेट, जिल्हा परिषदेसमोर भव्य आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
ओबीसींच्या हक्कांसाठी विविध मागण्या
ओबीसी आरक्षणातील कथित घुसखोरी रोखावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी, विद्यार्थ्यांना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण द्यावे, शिष्यवृत्ती नियमित उपलब्ध करून द्यावी, तसेच महाज्योती संस्थेला १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या आंदोलनाद्वारे मांडण्यात येणार आहेत.
याशिवाय बेरोजगारांना दरमहा २० हजार रुपये बेरोजगारी भत्ता द्यावा आणि नॉन क्रिमीलेअरची उत्पन्नमर्यादा २० लाख रुपये करावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका समितीने मांडली आहे.
मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
या आक्रोश धरणे आंदोलनात विद्यार्थी, युवक-युवती, महिला, भटक्या-विमुक्त समाजातील बांधव, तसेच आलुतेदार-बलुतेदार घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला ॲड. राजन दीक्षित, शंकरराव लिंगे, शेखर बंगाळे, अर्जुन (दादा) सलगर, अप्पाराव हाके, दत्तात्रय क्षीरसागर, दिलीप पतंगे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments