Advertisement

Responsive Advertisement

बांधबंदिस्ती, जलसंधारण आणि पीक नियोजनातूनच दुष्काळावर मात ! नैतिक मूल्ये, सामाजिक शिस्त आणि लोकसहभागातून दुष्काळ निवारण शक्य : पद्मश्री पोपटराव पवार

सोलापूर - प्रतिनिधी : दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता समाजात नैतिक मूल्ये, सामाजिक शिस्त आणि सामूहिक जबाबदारीची भावना रुजविणे आवश्यक आहे. शेतशिवारांची शास्त्रीय पद्धतीने बांधबंदिस्ती, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारण आणि पीकपद्धतीचे प्रभावी व्यवस्थापन या माध्यमातून दुष्काळाची तीव्रता कमी करता येऊ शकते, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच तथा पद्मश्री पुरस्कारप्राप्त पोपटराव पवार यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे उपस्थित होते.

पवार म्हणाले की, महाराष्ट्रात दुष्काळ निवारणासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या; मात्र त्यामध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक शिस्त आणि सामूहिक सहभाग यांचा पुरेसा विचार झाला नाही. दुष्काळ निवारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पाण्याचा वापर, जमिनीचे व्यवस्थापन आणि पीकपद्धती यामध्ये योग्य शिस्त आणल्यास दुष्काळाच्या संकटावर प्रभावीपणे मात करता येईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात नैतिक मूल्ये, लोककल्याण आणि समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. महाराष्ट्राला धार्मिक, सांस्कृतिक, वारकरी आणि सामाजिक चळवळींची समृद्ध परंपरा लाभली असून जल, जमीन आणि जंगल संवर्धन ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. या परंपरेचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक : कुलगुरू

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर यांनी दुष्काळाच्या समस्येवर केवळ चर्चा न करता त्यामागील कारणांचा सखोल अभ्यास, उपाययोजनांचे मूल्यमापन आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले. याच उद्देशाने विद्यापीठाने राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेचे आयोजन केले आहे. दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने सामाजिक भान, भूतदया आणि निसर्गसंवर्धनाची जबाबदारी ओळखून वर्तन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

परिषदेच्या सत्रात अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव जूगळे यांनी मार्गदर्शन केले. दुष्काळाची कारणे, त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विचार मांडले.

परिषदेतील चर्चेतून पुढे आलेल्या सूचना आणि उपाययोजनांच्या आधारे सर्वसमावेशक धोरणात्मक दस्तऐवज तयार करून तो शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी प्रास्ताविकात दिली.

यावेळी विद्यापीठातील विविध संकुलांचे संचालक, निमंत्रित सदस्य, शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकारी, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार डॉ. अंबादास भासके यांनी मानले.

Post a Comment

0 Comments