Advertisement

Responsive Advertisement

उत्तर सोलापुरातील शाळांची जिल्हास्तरीय समितीकडून अचानक तपासणी सिंदखेड, सोरेगाव शाळांतील उपक्रमांचे कौतुक; मद्रेतील सात धोकादायक वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे निर्देश

सोलापूर - प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील जनहित याचिका क्र. १/२०१८ अनुषंगाने गठित जिल्हास्तरीय तपासणी समितीने उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांची अचानक पाहणी केली. या तपासणीत शाळांमधील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

समितीने कुमठे मराठी, कुमठे उर्दू, कुलकर्णी तांडा, मद्रे, सिंदखेड, हत्तुर मराठी (मुले), हत्तुर (मुली), हत्तुर उर्दू आणि सोरेगाव येथील शाळांना भेटी दिल्या. शाळांमधील स्वच्छता, पिण्याचे पाणी, अध्यापन, विद्यार्थी लाभाच्या योजना आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची अंमलबजावणी तपासण्यात आली.

सिंदखेड, सोरेगावच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक

सिंदखेड आणि सोरेगाव येथील शाळांमध्ये राबविण्यात येणारे इंग्रजी संवाद कार्यक्रम, संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शिस्त आणि स्काऊट-गाईड उपक्रम पाहून समितीने समाधान व्यक्त केले. शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या लोकसहभागातून झालेली शाळांची रंगरंगोटी, शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचेही कौतुक करण्यात आले.

मद्रेतील सात वर्गखोल्या धोकादायक

तपासणीदरम्यान मद्रे येथील सात वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचे आढळले. वर्गखोल्यांतील प्लास्टर निघाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. हत्तुर, कुलकर्णी तांडा आणि मद्रे येथे पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, तर काही शाळांमध्ये मुली, महिला शिक्षक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था निदर्शनास आली.

कुमठे उर्दू आणि कुलकर्णी तांडा शाळांमध्ये रॅम्प व ग्रीलचा अभाव, तर हत्तुर उर्दू शाळेतील स्वयंपाकगृहाजवळील भिंतीला तडे गेल्याचेही आढळले. धोकादायक खोल्यांमधील डेड स्टॉक आणि अडगळ तातडीने हटविण्याच्या सूचना समितीने दिल्या.

शिक्षकांच्या अनुपस्थितीची चौकशी करण्याचे निर्देश

कुमठे मराठी शाळेतील शिक्षकांच्या अनुपस्थिती व विलंबाच्या प्रकाराची शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. शिक्षकांच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासही सांगण्यात आले. विद्यार्थी सुरक्षा समित्या आणि तक्रार पेट्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

कुमठे उर्दू शाळेतील परिपाठाचे निरीक्षण करण्यात आले. तसेच पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश सर्व शाळांना देण्यात आले.

विद्यार्थिनींना पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन

समिती सदस्यांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नायब तहसीलदार अश्विनी दराडे आणि पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. पवार यांनी विद्यार्थिनींना पोक्सो कायदा, विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षित वर्तन याबाबत मार्गदर्शन केले. सोरेगाव शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासकीय योजनांची माहिती घेण्यात आली. पालकांनी या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि पोषक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही शाळा प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही बाब दुर्लक्षित करू नये, असे निर्देश समितीने दिले.

या समितीचे अध्यक्ष तथा माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार अश्विनी दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, पोलीस विभागाचे प्रतिनिधी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी आणि हत्तुर केंद्रप्रमुख या पाहणीवेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments