Advertisement

Responsive Advertisement

दुधासाठी प्लास्टिक कॅन वापरू नका; हॉटेलमधील खाद्यरंगावरही निर्बंध ! सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांचे आवाहन; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई


सोलापूर - प्रतिनिधी : नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. दूध वाहतुकीसाठी प्लास्टिक कॅनचा वापर टाळावा, हॉटेलमधील खाद्यपदार्थांत अनावश्यक खाद्यरंग वापरू नयेत, तसेच शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात जंक फूडची विक्री करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.

दूध वाहतुकीसाठी स्टेनलेस स्टीलच्या कॅनचा वापर करा

दूध वाहतुकीसाठी प्लास्टिक कॅनचा वारंवार वापर केल्यास त्यातील काही घटक दुधात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दूध उत्पादक संस्था, दूध संकलन केंद्रे आणि वाहतूकदारांनी प्लास्टिक कॅनऐवजी स्टेनलेस स्टीलच्या कॅनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावर निर्बंध

हॉटेल, रेस्टॉरंट, चायनीज सेंटर आणि बिर्याणी विक्रेत्यांनी तयार अन्नपदार्थांमध्ये अनावश्यक खाद्यरंगाचा वापर करू नये. स्वीट आणि बेकरी पदार्थांसाठीच नियमानुसार मर्यादित प्रमाणात, म्हणजे १०० पीपीएमपर्यंत, खाद्यरंग वापरण्याची परवानगी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित व्यावसायिकांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीस मनाई

लहान मुलांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात जास्त साखर, मीठ आणि तेल असलेल्या पदार्थांची विक्री व उत्पादन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्हाभरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. दूध वाहतुकीसाठी नियमबाह्य कॅन वापरणारे विक्रेते, परवानगीपेक्षा अधिक किंवा नियमबाह्य खाद्यरंग वापरणारे हॉटेलचालक आणि शाळांच्या परिसरात प्रतिबंधित खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण व्हावे, यासाठी व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments